रांजणगाव, शिरूर : अगदी काही महिन्यांवर पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक येऊन ठेपली आहे. शिरूर तालुक्यातील अनेक भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी अप्रत्यक्ष प्रचारालाच सुरुवात केली आहे. कारेगाव – रांजणगाव गणपती गटात सद्या निवडणुकीच्या अगोदरचे वारे चांगलेच वाहू लागले आहे.
राष्ट्रवादीच्या स्वाती पाचूंदकर या कारेगाव – रांजणगाव गणपती गटाच्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्या आहेत. मात्र यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळते हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
अद्याप आरक्षण जाहीर झालेले नाही, त्याचबरोबर गटाची रचना स्पष्ट नाही, मात्र पाचुंदकर कुटुंबातील इच्छुक उमेदवार जोरदार तयारीत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिरुर-आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर आणि माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर या दोघांचेही सोशल मीडियावर भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून पोस्टर झळकू लागले आहेत. एवढंच काय तर दोघांचाही गटात वावर वाढला आहे. मात्र उमेदवारीत बाजी कोण मारणार याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.
गेल्या रांजणगाव गणपती ग्रामपंचायत निवडणूकीत पाचूंदकर कुटुंबाला पराभव पत्करावा लागला आहे. दहा वर्षे सत्ता असलेली ग्रामपंचायत हातून निसटली. त्यामुळे यावेळी पाचूंदकर कुटुंब अगोदरच जोरदार तयारीला लागलेले दिसत आहे.
शेखर पाचूंदकर यांनी एकदा जिल्हा परिषद सदस्य पद भूषविल्याने जिल्हा परिषदेचा दांडगा अभ्यास आहे, त्याचा उपयोग स्वाती पाचूंदकर यांच्या कारकिर्दीत अनेकांनी अनुभवला आहे. त्याचबरोबर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतली पक्षाच्या ग्राउंड प्लॅनिंगची जबाबदारी शेखर यांनी व्यवस्थित पार पडली असल्याने पक्षातील वरिष्ठ नेते खुश आहेत. त्यामुळे शेखर पाचूंदकर प्रबळ दावेदार असल्याचे बोलले जात आहे. तर मानसिंग पाचूंदकर यांच्यावर अगोदरच पक्षाने शिरूर – आंबेगाव विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. त्याचबरोबर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी असलेली जवळीक त्यामुळे पक्ष आणखी जबाबदारी सोपावणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
शेखर पाचूंदकर यांचा प्रचार कार्यकर्त्यांनी जवळपास सुरूच केलाय असं म्हणायला हरकत नाही. कारण सोशल मीडियावर ‘भावी जिल्हा परिषद सदस्य’, ‘मिशन जिल्हा परिषद’ असे पोस्टर बनवून कार्यकर्त्यांनी आत्ताच रणशिंग फुंकले आहे. तर भाजपकडून देखील कारेगावचे माजी सरपंच अनिल नवले यांच्याही नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अजून निवडणूक जाहीर झाली नाही त्यामुळे इतर इच्छुकांची नावे आणखी गुलदस्त्यात आहेत. मात्र येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत कारेगाव -रांजणगाव गणपती गटात रंगत पहायला मिळणार आहे.
Add Comment