अभिष्टचिंतन विशेष
शिरूर,पुणे – महाराष्ट्रालाच नव्हे नव्हे तर देशाला देखील राजकारणातला पवार पॅटर्न परिचित आहे. समोरच्या पैलवानाला चारी मुंड्या चित करून राजकारणाची कुस्ती निकाली काढणाऱ्या पवार पॅटर्नची चर्चा आता पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातही आहे.
शिरूर – हवेली मतदार संघाचे आमदार अशोक पवार यांनी शिरूर तालुक्याच्या सर्व सहकारी संस्थांवर एकहाती सत्ता काबीज करून विरोधकांची एक प्रकारे वजाबाकीच केली आहे. शिरूर तालुक्यातील बाजार समिती, खरेदीविक्री संघ, पंचायत समिती, घोडगंगा सहकारी साखर कारखाना अशा सर्वच संस्थांच्या केंद्रस्थानी एकमेव नाव म्हणजे आमदार अशोक पवार. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या विरोधात मतमोजणी पासून ४९८ मतांची आघाडी घेत तब्बल ४१ हजार ५०४ मताधिक्याने निवडून येत विरोधकांनाच नव्हे तर मतदारांनाही आश्चर्यकारक धक्का देऊन, शिरूर तालुक्यावर पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
बाजार समिती, पंचायत समिती, खरेदीविक्री संघ, घोडगंगा साखर कारखाना अशा सर्वच सहकारी संस्थांवर आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांना बहुमतापासून दहा हात दूरच ठेवले आहे. शिरूर तालुक्याच्या राजकारणात पत्नी सुजाता पवार यांची एन्ट्री देखील धडाकेबाज झाली आहे, मांडवगण फराटा गटातून त्या विध्यमान जिल्हा परिषद सदस्या आहेत, तर त्यांनी कृषी व पशु संवर्धन समितीच्या सभापती असताना शिरूर तालुक्यात अनेक शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेच्या योजनांचा लाभ मिळवून दिला आहे.
येत्या काही महिन्यांवर कारखाना, जिल्हा बँक, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत परंतु विरोधकांच्या गोटात पूर्णपणे शांतता पसरलेली आहे. इकडे आमदार पवारांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकींच्या रिंगणात उतरू इच्छिणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत विरोधकांनी वेगवेगळ्या डावपेचांचा वापर करून पाहिला मात्र आमदार पवार यांनी अगोदरच विरोधकांच्या दोन पाऊलं पुढे जाऊन त्यांचेच डावपेच ठाऊक असल्याप्रमाणे सगळे डाव निकामी करून स्वतःचे नेतृत्व अनेकदा निश्चित केले आहे. अगदी बाजार समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीतही.
सातत्याने अनेक टीका होऊनही तालुक्यातील सत्तेच्या केंद्रस्थानी भक्कमपणे पाय रोवून उभे असलेले आमदार पवार उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दंड थोपटणार हे मात्र नक्की. विरोधकांच्या हाती न लागता शिरूरच्या आखाड्यात भल्या- भल्यांना धोबीपछाड करून राजकारणातील कुस्ती निकाली काढणारे आणि तेल लावलेला पैलवान म्हणजे आमदार अशोक पवार यांची ख्याती आहे.
राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातही पवार पॅटर्न चर्चिला जातो. इकडे पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे जिल्हा परिषद, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, दूध संघ, जिल्ह्यातील अशा अनेक संस्थांमध्येही अजित पवरांचाच करिष्मा चालतो त्यामुळे तिथेही पवार पॅटर्नचीच चर्चा असते, तर शिरूर तालुक्याच्या राजकारणातही आता सगळ्या सहकारी संस्था ताब्यात ठेवत विरोधकांची वजाबाकी करून तालुक्यात एकहाती सत्ता प्रस्थापित करणाऱ्या आमदार अशोक पवार यांच्या पवार पॅटर्नचीच जोरदार चर्चा आहे.
तर आमदार अशोक पवार यांना अभिष्टचिंतना निमित्ताने The बातमी कडून खूप खूप शुभेच्छा….!
Add Comment