चाकण, पुणे | गेल्या काही दिवसांपासून धुमसत असलेल्या नगरपरिषदेच्या मिळकतकर वाढीच्या प्रश्नी काल (दि. २९ रोजी) खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सर्वच पक्षांच्या प्रतिनिधींनी चुकीच्या पद्धतीने झालेल्या सर्व्हेक्षणाच्या आधारे मिळकतकरधारकांचे कंबरडे मोडणारी नगरपरिषदेची ४० टक्के करवाढ मान्य नसल्याची भूमिका मांडली. त्याचबरोबर असंख्य मिळकतधारकांना अद्याप बिलांचे वाटपही झालेले नाही. अशा परिस्थितीत त्यांनी हरकती कशा नोंदवायच्या असा सवाल करीत हरकती नोंदविण्यासाठी सध्या असलेली ३ नोव्हेबरची मुदत वाढवावी अशी मागणी उपस्थित नागरिक व नेत्यांनी केली होती.
दरम्यान या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याप्रमाणेच डॉ. अमोल कोल्हे यांनी तत्काळ बैठकीतूनच थेट अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मिळकतकरात केलेली अवाजवी वाढ चाकणच्या नागरिकांवर अन्याय करणारी असून या करवाढी विरोधात हरकती मांडण्यासाठी दिवाळीचा कालावधी वगळून आणखी १० दिवसांची मुदत वाढवून देण्याची सूचना केली. केलेली सूचना मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांनी तात्काळ मान्य केली त्याचबरोबर आवश्यकता भासल्यास आणखी मुदतवाढ देण्याचे देखील मान्य केले, त्यामुळे चाकणच्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी या करवाढीच्या विषयात आपण येथील जनतेसोबत आहोत असे डॉ. कोल्हे यांनी सर्वपक्षीय बैठकीत सांगितले. त्यामुळे चाकणकरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यशैलीचा अनुभव डॉ. अमोल कोल्हे यांच्यामध्ये पाहायला मिळाला.
दरम्यान या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्यासह उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून चाकण परिसरातील मिळकतींचे फेर सर्व्हेक्षण करुन नागरिकांंवर केलेली प्रचंड करवाढ रद्द करावी अशी मागणी करणार असल्याचे सांगितले. या करवाढीच्या प्रश्नावर आपण व आमदार दिलीप मोहिते पाटील दोघेही चाकणच्या जनतेसोबत आहोत आणि जर आंदोलन करण्याची वेळ आलीच तर मी स्वतः तुमच्या सोबत सर्वांच्या पुढे असेन असे आश्वासन देखील खासदार डॉ. कोल्हे यांनी सर्वांना दिले. त्यामुळे एकूणच चाकणच्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
Add Comment