आंबेगाव ताज्या घडामोडी राजकीय

आढळराव पाटील यांचा आघाडी सरकारच्या मंत्र्यांना घरचा आहेर.

मंत्र्यांनी आश्वासन न पाळल्याने बैलगाडा मालकांचा संयम सुटला – आढळराव पाटील

मंचर, पुणे | राज्यात गेली सात वर्षापासून बैलगाडा शर्यत बंदी असल्याने बैलगाडा मालकांचा संयम आता सुटू लागला आहे, बैलगाडा मालक आता राज्यात ठिकठिकाणी न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन करत बैलगाडा शर्यत भरवताना दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबे आणि गिरवली गावात बैलगाडा शर्यती भरविण्यात आल्या त्यामुळे घोडेगाव पोलिस स्टेशनमध्ये शंभर बैलगाडा मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान या बैलगाडा शर्यतींचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी समर्थन केले आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने बैलगाडा मालकांचा आता अंत पाहू नये अशा शब्दांत महाविकास आघाडीतील मंत्र्यांना घरचा आहेर दिला आहे. आज (दि. 6 ) रोजी मंचर येथे ते माध्यमांशी बोलत होते.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आम्ही एकाच व्यासपीठावर उपस्थित असताना तीन महिन्यांपूर्वी बैलगाडा मालकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. त्याचबरोबर नऊ वर्षांपूर्वी थापलींगच्या घाटामध्ये देखील माजी गृहमंत्री स्व. आर.आर. पाटील यांनीही असेच आश्वासन दिले होते. एवढच काय तर मध्यंतरी पाच आमदारांच्या आणि पाच मंत्र्यांच्या उपस्थितीत बैलगाडा मालकांना सरावासाठी परवानगी देऊ असे आश्वासन दिले होते. त्याचा अध्यादेश देखील अद्याप काढला नाही. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टात वकील देऊन केस सुरू करू असं आश्वासन दिले होते मात्र ते पाळले नाही. अशा प्रकारचे शब्द देऊन मंत्र्यांकडून पाळले जात नसल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटत आहे आणि त्यामुळे बैलगाडा शर्यती भरवल्या जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं काही चुकत नाही ही सगळी जबाबदारी सरकारची आहे अशा शब्दांत शिवसेनेचे माजी खासदार आढळराव पाटील यांनी महाविकास आघाडीतील मंत्र्यांनाच घरचा आहेर दिला आहे.

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!