शिरूर, पुणे | आयुष्यातील पहिल्याच निवडणुकीत यशस्वी ठरलेल्या डॉ.अमोल कोल्हेंच्या मनात नेमका कसला गोंधळ सुरू आहे ? आत्ता कुठे अभिनेता म्हणून नव्हे तर खासदार म्हणून लोकांना दिसायला लागलेले डॉ.कोल्हे अचानक अज्ञातवासात का गेले? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
अभिनय क्षेत्र आणि राजकारण याचा ताळमेळ घालण्यात डॉ.कोल्हे यांना मोठी कसरत करावी लागत असणार याबाबत शंका नाही. अभिनयाच्या जोरावर निवडून आलेल्या डॉ. कोल्हेंची राजकारणात गळचेपी होत आहे का ? असाही सवाल त्यांच्या फेसबुक पोस्टवरून उपस्थित केला जात आहे. कारण सिंहावलोकनाची वेळ अशा शब्दांत त्यांनी पोस्टची सुरुवात केली आणि त्यात आवर्जून उल्लेख केला आहे की, गेल्या काही दिवसांत, महिन्यांत, वर्षांत बेभान होऊन धावत राहिलो, काही टोकाचे निर्णय घेतले, अनपेक्षित पावलं उचलली. म्हणजे निवडणूक लढविणे हे टोकाचं पाऊल होतं की काय ? याची जाणीव ते स्वतःच्या मनाला करवून देत असतील का ? कारण राजकारणात ते नवीन पायंडा पडण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत मात्र यासाठी स्वकीयांकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नाही की काय? असाही प्रश्न निर्माण केला जात आहे.
ते पुढे असाही उल्लेख करतात की, पण हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय..थोडा शारीरिक, बराचसा मानसिक! शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल पण मानसिक थकवा घालवण्यासाठी हवं- थोडं मनन, थोडं चिंतन! म्हणजेच कुटुंबासाठी पाठीमागच्या काळात वेळ देता आला नाही याची सल मनामध्ये ठेऊन काही काळासाठी या विश्वातून बाजूला जाऊन कुटुंब सहल किंवा कुटुंबाच्या सानिध्यात वेळ घालविण्याची संधी स्वतःच उपलब्ध केली असावी असाही प्रश्न उपस्थित होतो. त्याचबरोबर आयुर्वेद किंवा इतर मार्गाने शारीरिक आणि मानसिक बदल घडविण्यासाठी ते अज्ञातवासात गेले की काय असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
घेतलेल्या निर्णयांचा विचार, आणि कदाचित फेरविचार सुद्धा!
त्यासाठीच एकांतवासात जातोय.. काही काळ संपर्क होणार नाही! पुन्हा लवकरच भेटू…नव्या जोमाने, नव्या जोशाने!! या ओळी मात्र अनेकांना विचार करायला लावणाऱ्या आहेत. याचा राजकीय अर्थ देखील अनेकांनी काढायला सुरुवात केली आहे मात्र डॉ. अमोल कोल्हे यांची अशी पोस्ट करून लोकांच्यात उत्सुकता निर्माण करण्याची आपल्याला वाटत असली तरी ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील डॉ.अमोल कोल्हे यांनी उत्सुकता निर्माण करणारी पोस्ट फेसबुकवर डिसेंबर 2019 मध्ये केली होती. त्यावेळी देखील अनेक राजकीय तर्क वितर्क लढविले जात होते. परंतु त्यांनी त्यावेळी त्यांच्या ‘जगदंब क्रियेशन’ आता केवळ मालिकाच नाही तर चित्रपट देखील निर्मिती करणार असल्याची घोषणा केली होती. त्यावेळी घेतलेला निर्णय आणि ‘शिवप्रताप’ तीन चित्रपट मालिकेमधील पहिल्या ‘वाघनखं’ चित्रपटाची घोषणा केली होती. त्याचबरोबर एक वर्षांपूर्वी 6 नोव्हेंबर 2020 रोजी तो प्रदर्शित होणार होता मात्र कोरोनाच्या संकटामुळे कदाचित तो प्रदर्शित झाला नसावा. म्हणून अशा प्रकारचे घेतलेले निर्णय आणि त्यांचा पुनर्विचार करणार की काय असा सवाल उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे शेवटी लिहिलेली त्यांची टीप बऱ्याच गोष्टी सांगून जाणारी आहे.
Add Comment