शिरूर, पुणे | महाराष्ट्रात गाजत असलेला शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्न दिसू लागली आहे. येत्या सोमवारी (दि. १५) रोजी सर्वोच्च न्यायालयात बैलगाडा शर्यत बंदीवरची सुनावणी होणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आवाहन देत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे, त्याची पहिली पायरी सोमवार पासून सुरू होत आहे. महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटवावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याला सर्वोच्च न्यायालयाने सकारात्मक प्रतिसाद देत येत्या सोमवारी सुनावणी घेतली जाणार आहे. त्यामुळे बैलगाडा शौकीन आनंद साजरा करत आहेत. बैलगाडा शर्यतीवर बंदी आल्यापासून सातत्याने शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील प्रयत्न करत आहे त्याचबरोबर आता विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे देखील प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकारकडे यापूर्वी दोघांनीही पाठपुरावा सुरूच ठेवला होता.
मागील काही महिन्यांपासून बैलगाडा शर्यत बंदी उठविण्यासाठी शेतकऱ्यांनी सातत्याने लोकप्रतिनिधी व राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. या संदर्भात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ओझर येथे बैलगाडा मालक शेतकऱ्यांची बैठक घेतल्यानंतर शर्यत बंदी उठविण्याच्या प्रयत्नांना वेग आला होता. त्यानंतर राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री श्री. सुनील केदार यांनी बैलगाडा मालक, शेतकरी व बैलगाडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची मंत्रालयाच्या प्रांगणात जाहीर बैठक घेतली होती. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी लवकर सुनावणी करण्यासाठी राज्याचे महाधिवक्ता अॅड. आशुतोष कुंभकोणी यांना सूचना देण्यात येतील असे श्री. केदार यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयात बैलगाडा शर्यत बंदी प्रकरणी लवकर सुनावणी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना यश आले असून येत्या सोमवारपासून (दि.१५ नोव्हेंबर) या प्रकरणी सुनावणी होणार आहे. अशी माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून देण्यात आली आहे.
येत्या सोमवारी (दि. १५) रोजी बैलगाडा शर्यत बंदीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याच्या वृत्ताला ‘The बातमी‘ बोलतना पशु संवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. भड यांनी दुजोरा दिला आहे.
Add Comment