शिरूर, पुणे| राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन आजपासून (दि. २२) सुरु झाले आहे मात्र सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र या सरपंच संघटनेच्या वतीने आजच्या दिवशी ग्रामपंचायत बंद ठेऊन राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. राज्यातील ग्रामपंचायतच्या अठरा मागण्या मान्य करण्यासाठी सरपंच परिषदेकडून संप पुकारण्यात आला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे सरपंच परिषदेचे शिरूर तालुका अध्यक्ष विकास मासळकर यांनी सांगितले.
कोरोना काळात गावच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या तीस पेक्षा अधिक सरपंचांना आपला प्राण गमवावा लागला त्या सारपंचांचे कुटुंब आर्थिक अडचणीत आले त्यामुळे या कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी त्याचबरोबर सारपंचांच्या मानधनात वाढ व्हावी. पंधराव्या वित्त आयोगातील रक्कम कपात न करता विकासकामासाठी खर्च करता यावी. संगणक चालक हा ग्रामपंचायत कर्मचारी समजण्यात यावा. गावातील पाणीपुरवठ्याच्या बिलांची दुरुस्ती. ग्रामपंचायत पॅनल बंदी कायदा करावा. अशा तब्बल अठरा प्रकारच्या मागण्यांसाठी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर ग्रामपंचायत बंद ठेऊन संप पाळण्यात आला आहे.
दरम्यान शिरूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती बंद ठेऊन हा संप करण्यात आला त्याचबरोबर ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामसेवक यांनी देखील या संपला पाठींबा दिला असल्याचे शिरूर तालुका कार्याध्यक्ष भाऊसाहेब लंघे यांनी सांगितले. राज्य सरकारने या मागण्यांचा विचार न केल्यास संपूर्ण राज्यभरात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देखील सरपंच परिषदेच्या वतीने देण्यात आला आहे. या संपात शिरूर तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी, सरपंच संदीप खैरे, रमेश गडदे, संदीप तांबे, दीपक खैरे, त्रिनयन कळमकर यांनी सहभाग नोंदविला.
Add Comment