आंबेगाव ताज्या घडामोडी राजकीय

लांडेवाडीत पहिल्या बारी पुढे डॉ. कोल्हे घोडी धरणार का..?

मंचर | खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी निवडणुकीपूर्वी बैलगाडा शर्यत सुरू झाल्यानंतर पहिल्या बारी म्होरं घोडी धरण्याचे आश्वासन दिले होते. आता ते आश्वासन पूर्ण करण्याची वेळ आली आहे, याचं कारण म्हणजे पुणे जिल्ह्यातील पहिली बैलगाडा शर्यत माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या गावात म्हणजेच लांडेवाडी याठिकाणी १ जानेवारी रोजी भरणार आहे. या पहिल्या शर्यतीत पहिल्या बारी पुढे खासदार डॉ. अमोल कोल्हे घोडी धरणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जिल्हाधिकारी पुणे यांच्या परवानगीने महाराष्ट्र राज्यातील पहिली बैलगाडा शर्यत नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे १ जानेवारी २०२२ रोजी आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी-चिंचोडी येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती बैलगाडा शर्यतीचे खंदे पुरस्कर्ते शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाने सशर्त बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवल्यावर महाराष्ट्र राज्यात सगळीकडे परवानगी साठी धावाधाव सुरू झाली. आपला अभ्यासू बाणा दाखवून देत माजी खासदार आढळराव पाटील यांनी सर्व अडचणींवर मात करून त्यांचे जन्मगाव असलेल्या लांडेवाडीत बैलगाडा शर्यती सर्वप्रथम भरावण्याचा मान मिळवून दिला. याकामी सरपंच व बैलगाडा मालक ग्रामस्थांची एकी कामी येत सर्वांनी नेटाने जिल्हाधिकारी कार्यालयात आवश्यक कागदपत्रांची तात्काळ पूर्तता केली. त्यामुळेच अतिशय क्लिष्ट समजली जाणारी परवानगी माजी खासदार आढळराव पाटील यांच्या गावाला सर्वात आधी मिळाली.

बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी मिळाली असून येथील यात्रा कमिटी सर्व नियमांचे तंतोतंत पालन करणार असून स्पर्धेत भाग घेणाऱ्या बैलगाडा मालकांनी देखील अखंड शर्यती सुरू रहाव्या यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नियमांचे डोळ्यात तेल घालून पालक करावे व आयोजकांना सहकार्य करावे असे आवाहन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले आहे.
त्यामुळे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी निवडणुकीपूर्वी पहिल्या बारी म्होरं घोडी धरण्याचे दिलेले आश्वासन पाळणार का..? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!