ताज्या घडामोडी पुणे राजकीय शिरूर

पाच वर्गमित्र ग्रामपंचायतचे युवा कारभारी…!

शिरूर, पुणे | तरूणांनी राजकारणात आल्यावर देशाची प्रगती होईल अशी वाक्य अनेकदा आपण मोठ्या राजकीय नेत्यांच्या तोंडून ऐकली असतीलच. तरुणांनी राजकारणात येऊन सामाजिक प्रश्न हाताळण्यासाठी स्थानिक संस्थांवर पकड निर्माण करावी आणि त्यामार्फत जनतेच्या अडचणी सोडवाव्यात या अपेक्षा तरुणांकडून करताना आपण सर्वच जण पाहतो. अशाच प्रकारे करंदी (ता. शिरूर) येथील अंगणवाडीपासून एका वर्गात शिकलेले पाच वर्गमित्र गावच्या ग्रामपंचायतीत निवडून गेले आहेत.

करंदी गावाच्या ग्रामपंचायतचे उपसरपंच म्हणून बबन उर्फ बबलू ढोकले हे कार्यरत आहेत तर त्यांच्याच सोबत ग्रामपंचायत सदस्य म्हणून नितीन ढोकले आणि संदीप ढोकले सद्याच्या ग्रामपंचायतचे कारभारी आहेत त्याचबरोबर या अगोदरच्या ग्रामपंचायत कार्यकारी मंडळात चेतन दरेकर आणि विशाल खरपुडे यांनी देखील उपसरपंच पद भूषविले आहे. हे सर्व पाचही जण अंगणवाडीपासून एकाच वर्गात शिकलेले आहेत शिवाय गावचे एकूण पाच वार्ड आहेत त्यामध्ये हे पाचही वर्गमित्र वेगवेगळ्या वार्डमधून निवडून आले आहेत. ग्रामपंचायतीच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात वाद तंटे पाहायला मिळतात मात्र यातील दोन सदस्य यापूर्वीच्या निवडणुकीत एकमेकांसमोर निवडणूक लढले होते, शिवाय निवडणुकीच्या अगोदरही ते एकमेकांचे जिवलग मित्र होते आणि आजही त्यांची मैत्री तशीच आहे. त्यामुळे राजकारण राजकारणाच्या जागी ठेऊन या मित्रांनी मैत्री जपत एक आदर्श घालून दिला आहे.

तरुणांना संधी मिळाली की विकास होतो अशी धारणा आहे. त्यामुळे या पाचही तरुण मित्रांना वेगवेगळ्या वार्डमधून ग्रामस्थांनी निवडून दिले आणि मैत्रीचा एक आदर्श निर्माण केला आहे. गावच्या राजकारणात एकमेकांच्या विरोधी गटातील असले तरी वर्गमित्र म्हणून या पाचही जणांनी मैत्रीत राजकारण केले नसल्याने एका विवाह प्रसंगी एकत्रित आल्यानंतर त्यांना फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही.

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!