सेन्टर फॉर इंडस्ट्री 4.0 (C4i4) ची स्थापना केंद्र सरकारच्या ‘समर्थ भारत उद्योग’ उपक्रमांतर्गत करण्यात आली असून उद्योगांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी या लॅबच्या माध्यमातून या व्यावसायिकांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती देणे, व्यवसायात अद्ययावत तंत्रज्ञान वापरून घडी बसवून देणे, मार्गदर्शन करणे आदी गोष्टी या लॅबच्या माध्यमातून केल्या जातात. याचे पुण्यातील केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात स्थापन करण्यात आले आहे.
पुणे, दि.१८- भारत देश डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने जात आहे. भारतातील उत्पादन क्षेत्रातही परिवर्तन घडविण्यासाठी केंद्र सरकारकडून लघु व मध्यम उद्योगांना समर्थ भारत उद्योग उपक्रमांतर्गत प्रोत्साहन दिले जात आहे. यातुन भारताला उत्पादन क्षेत्राचे केंद्र बनवायचे आहे असे मत केंद्रीय अवजड उद्योगमंत्री महेंद्रनाथ पांडे यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात असणाऱ्या ‘C4i4 लॅब’ च्या माध्यमातून आज भारतातील लघु व मध्यम उद्योगांसाठी उपयुक्त असणाच्या आय-फॅक्टरी अलायन्स चे विमोचन आज करण्यात आले. हया अंतर्गत ई शेड्यूलिंग, ऑर्डर ट्रेसेबलिटी, शॉप फ्लोअर प्लॅनर, डिजिटल सर्व्हिस मॅनेजमेंट अँड सेल्स कॉन्फिगरेटर अँप्लिकेशनचा समावेश आहे. या अँप्लिकेशनच्या उद्घाटन प्रसंगी महेंद्रनाथ पांडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, उद्योजक राहुल किर्लोस्कर, C4i4 लॅबचे संचालक दत्तात्रय नवलगुंदकर, तर टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक गिरीश वाघ हे ऑनलाइन उपस्थित होते. तसेच प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, विद्यापीठातील इनोव्हेशन सेंटरच्या संचालिका डॉ अपूर्वा पालकर हेही उपस्थित होते.
महेंद्रनाथ पांडे म्हणाले, भारतभरात अवजड उद्योग विभाग अंतर्गत, १५५ हुन अधिक प्रकल्प सुरू आहेत.
यावेळी टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक गिरीश वाघ यांची मुलाखत घेण्यात आली. वाघ म्हणाले, भारतात कोव्हिड काळात नऊ पटीने डिजीटायझेशन वाढले आहे. आपला ग्राहकच जर डिजिटल झाला असेल तर अर्थातच उत्पादन कंपन्यांनीही ग्राहकांच्या गरजा या त्यांना अपेक्षित पध्दतीने सोडविल्या पाहिजेत. छोट्या व मध्यम उद्योगांनी आता बदलण्यास सुरुवात केली आहे.
दत्तात्रय नवलगुंदकर म्हणाले, अडचणी या स्पर्धा करून नाही तर सहयोग करून सोडवायला हव्यात. C4I4 च्या माध्यमातून आम्ही उद्योगातील अडचणी सोडवायला मदत करतो.
C4i4 लॅब विद्यापीठ परिसरात आणण्यामागे महत्त्वाचे कारण उद्योग आणि शिक्षण एकत्रीकरण आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना याची माहिती व्हावी तसेच उद्योगांमधील मूळ प्रश्नांवर संशोधन करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळावी हा यामागे हेतू आहे. यातून स्टार्टअपनाही चालना मिळेल.
– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
Add Comment