ताज्या घडामोडी शिरूर

पाचंगेंनी उपोषनाचा इशारा देताच प्रशासन खडबडून जागे.

चाकण – शिक्रापूर रस्त्याची डागडुजी सुरू.

शिक्रापूर (ता. शिरुर) — शिक्रापूर ते चाकण या महत्त्वाच्या मार्गावरील खड्ड्यांमुळे होणारी नित्याची वाहतूक कोंडी त्यामुळे नागरिक आणि वाहनधारकांना होत असलेल्या प्रचंड त्रासाच्या पार्श्वभूमीवर, भाजप उद्योग आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय पाचंगे यांच्या नेतृत्वाखाली काल ४ नोव्हेंबर रोजी सकाळी शिक्रापूरच्या चाकण चौकात खड्ड्यात बसून उपोषण आंदोलन करण्यात येणार असल्याचा त्यांनी इशारा दिला होता. या अनोख्या आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आणि अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्काळ काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

संजय पाचंगे यांनी यापूर्वीच शिक्रापूर-चाकण रस्त्यावरील खड्ड्यांच्या निकृष्ट अवस्थेबाबत प्रशासनाला इशारा देत, वेळेत काम न झाल्यास “खड्यात उपोषण” करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यानुसार मंगळवारी (दि. ४) सकाळी ११.३० वाजता शिक्रापूर चौकात प्रतीकात्मक पद्धतीने खड्ड्यात बसून उपोषण आंदोलन सुरू होणार होण्याअगोदर सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभागाचे उपअभियंता मा. राहुल कदम आणि ज्युनियर इंजिनिअर मा. बोंदारडे यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. चर्चेत खालील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले:

शिक्रापूरपासून पुढे चाकणकडे असलेल्या सर्व खड्ड्यांचे तात्काळ डांबरीकरणाने भरण्याचे काम सुरू करणे.
१६ किलोमीटर रस्त्याचे पूर्ण डांबरीकरण व रुंदीकरणाचे टेंडर आजच ओपन करण्यात आले असून, प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून पुढील २० दिवसांत काम सुरू करण्याचे आश्वासन.
आंदोलन स्थळीच डांबर व खडी आणून प्राथमिक स्वरूपात खड्डे बुजवण्याचे काम तत्काळ सुरू करण्यात आले.
या निर्णयांनंतर आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावरील विश्वास दाखवून उपोषण स्थगित केले.

या आंदोलनावेळी सणसवाडीचे माजी उपसरपंच सागर दरेकर, उद्योजक श्रीपाद जगताप, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे गणेश डफळ, सचिन जाधव, गुलाबराव पवार, बंटी पवार, मंगेश सासवडे, भुमाता ब्रिगेडच्या मंगल सासवडे, सतीश सासवडे, अॅड. प्रविण कर्डिले, भाजप आध्यात्मिक आघाडीचे शिरुर तालुका अध्यक्ष पंढरीनाथ गायकवाड, सुरेश खुरपे, संतोष चौरसिया आदी मान्यवर उपस्थित होते.

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय पाचंगे यांनी सांगितले, “हा रस्ता शेतकरी, कामगार, विद्यार्थी, आणि उद्योगधंद्यांसाठी जीवनवाहिनी आहे. अनेक दिवसांपासून प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे लोक त्रस्त होते. आमच्या आंदोलनामुळे अखेर प्रशासनाला जाग आली. आता हे काम वेळेत पूर्ण व्हावे, हीच अपेक्षा आहे.” या आंदोलनामुळे शिक्रापूर-चाकण मार्गावरील रस्त्याच्या दुरुस्तीबाबत ठोस हालचाल सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!