खानापूर : आमदार गोपीचंद पडळकर यांनी खानापूर नगरपंचायतीच्या निवडणूकीत संपूर्ण ताकद पणाला लावली होती मात्र पुन्हा सत्ताधारी शिवसेना आणि काँग्रेसच्या पॅनेलने बाजी मारली आहे. सत्ताधारी शिवसेना-काँग्रेसला 9 तर विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित जनता आघाडीला 7 जागा मिळाल्या असून, त्यांचाच एक समर्थक अपक्ष निवडून असल्याचे समोर आले आहे. पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला मात्र एकाही जागी विजय मिळवता आला नाही.
खानापूर ग्रामपंचायतीची नगरपालिका झाल्यानंतर ही दुसरी निवडणूक झाली आहे. निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-शिवसेना महाआघाडी, विरोधी राष्ट्रवादी पुरस्कृत राजेंद्र माने, सचिन शिंदे, राजाभाऊ शिंदे यांची जनता आघाडी आणि भाजप अशी तिरंगी लढत झाली होती. शिवसेना-काँग्रेसच्या पॅनेलचे नेतृत्व आमदार अनिल बाबर, सुहास शिंदे, पांडुरंग डोंगरे यांनी केले होते. त्यांनी १७ पैकी ९ जागा जिंकून या निवडणुकीत काठावर पास झाले आहेत.
या निवडणुकीत भाजपने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली ताकद लावली होती. पडळकर यांनी खानापूर नगरपंचायतीच्या माध्यमातून तालुक्यातील स्थानिक पातळीवर राजकीय प्रवेशाचा प्रयत्न केला होता. मात्र, भाजपला एकही जागा मिळवता आली नाही. खानापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकालाचा परिणाम भविष्यात जिल्हा परिषद गटावर होणार आहे असल्याचे बोलले जाते. यापुढे पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे खानापूर नगरपंचायतीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
निवडणुकीत सत्ताधारी आमदार अनिल बाबर व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुहास नाना शिंदे यांच्या कॉंग्रेस-शिवसेना महाविकास आघाडीने सत्ता कायम राखण्यासाठी प्रयत्न केले होते. राष्ट्रवादी पुरस्कृत जनता आघाडीचे नेतृत्व माजी आमदार सदाशिव पाटील यांनी केले होते. या आघाडीच्या राजेंद्र माने, सचिन शिंदे, राजाभाऊ शिंदे यांच्या गटाने सत्ता परिवर्तनासाठी ताकद लावली होती. मात्र गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीची चर्चा संपूर्ण राज्यात होत आहे.
Add Comment