मावळ प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील एकमेव नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वर्चस्व प्रस्थापित केले असून मावळ लोकसभा निवडणुकीत सुनील शेळकेच किंग मेकर असणार अशी काहीशी वाटचाल सुरू केली आहे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र देहूगाव नगरपंचायत निवडणुकीतून शिवसेना हद्दपार झाली, तर भाजपाला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. त्यामुळे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपाचे माजी मंत्री बाळा भेगडे यांना मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे हा निकाल आगामी लोकसभा निवडणुकीतील पार्थ पवारांच्या विजयाची नांदी मानली जात आहे. तीर्थक्षेत्र देहूगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली असून राष्ट्रवादीचे १४, अपक्ष २ आणि भाजपचे 1 उमेदवार विजयी झाले असल्याने नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आली आहे. शिवसेना व आय काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही.
ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाल्यानंतर देहूगाव नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक होती. या निवडणुकीत दोन टप्प्यात मतदान पार पडले होते. त्याची मतमोजणी पार पडली. राज्यातील महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी या ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवली होती.
मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांची जादू चालली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे 14 उमेदवार विजयी झालेत. तर, दोन अपक्षांनी बाजी मारली असून भाजपचा एक उमेदवार विजयी झाला आहे. राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता आली. दरम्यान, राष्ट्रवादीच्या दोन मातब्बर उमेदवाराचा पराभव झाला. दरम्यान, आमदार सुनील शेळके यांनी निवडून आलेल्या सर्व राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. तसेच, राष्ट्रवादीच्या पारड्यात मतदान केल्याबद्दल मतदारांचेही आभार मानले आहेत.
अजित पवारांच्या पट्टा ठरणार मावळ लोकसभेचा ‘किंगमेकर’.
राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांचा झालेला पराभव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिव्हारी लागला होता. मावळातील घाटाखालील भागात पार्थ पवार यांनी जनसंपर्क वाढला आहे. पार्थ पवार फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम हाती घेतले जात आहेत. आगामी २०२४ च्या निवडणुकीत पार्थ पवार मावळातून पुन्हा मैदानात उतरतील. तोपर्यंत राष्ट्रवादीचे आमदार आणि अजित पवार यांचा पट्टा. अशी ओळख असलेले सुनील शेळके यांनी लोकसभा निवडणुकी पार्थ पवारांचा रस्ता प्रशस्त करण्याची भूमिका ठेवली आहे. यासोबतच भाजपाचे माजी मंत्री बाळा भेगडे यांचाही ‘करेक्ट कार्यक्रम’ केला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत सुनील शेळके ‘किंगमेकर’ ठरतील, असे चित्र आहे.
निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे :
राष्ट्रवादी : १४
प्रभाग क्रमांक १ मध्ये मीना कुराडे, प्रभाग क्रमांक २ मध्ये रसिका काळोखे, प्रभाग क्रमांक ३ मध्ये पूजा दिवटे, प्रभाग क्रमांक ४ मयूर शिवशरण, प्रभाग क्रमांक ६ मध्ये पुनम काळोखे, प्रभाग क्रमांक ९ मध्ये स्मिता चव्हाण, प्रभाग क्रमांक १० मध्ये सुधीर काळोखे, प्रभाग क्रमांक ११ मध्ये पोर्णिमा परदेशी, प्रभाग क्रमांक १२ मध्ये सपना मोरे, प्रभाग क्रमांक १३ मध्ये प्रियंका मोरे, प्रभाग क्रमांक १४ मध्ये प्रवीण काळोखे, प्रभाग क्रमांक १५ मध्ये आदित्य टिळेकर, प्रभाग क्रमांक १६ मध्ये योगेश परंडवाल, प्रभाग क्रमांक १७ मध्ये ज्योती गोविंद टिळेकर हे राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले आहेत.
दोन अपक्ष, एक भाजप :
प्रभाग क्रमांक ७ मध्ये योगेश काळोखे व प्रभाग क्रमांक ५ मध्ये शितल हगवणे हे दोन अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक ८ मध्ये भाजपच्या पूजा काळोखे निवडून आल्या आहेत.
Add Comment