मंचर, पुणे | गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्तीय व अतिशय जवळचे मानले जाणाऱ्या तीन विश्वासू सहकाऱ्यांची कालवा सल्लागार समितीवर वर्णी लागली आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शिरुर आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील तीन कार्यकर्त्यांना कालवा सल्लागार समितीवर काम करण्याची संधी दिली आहे.
राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या देखरेखीखाली कालवा सल्लागार समितीचे कामकाज चालते या समितीतील सदस्यांची नेमणूक गृहमंत्री वळसे पाटील यांच्या शिफारशीने जयंत पाटील यांनी केली आहे. वळसे पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेले सहकार क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली असे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शिरुर आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर आणि करंदीचे माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र ढोकले. या तिघांवर नेहमी प्रमाणे वळसे पाटील यांनी विश्वास दाखवत कुकडी कालवा सल्लागार समितीच्या सदस्य पदाची माळ गळ्यात टाकली आहे.
ऐन पुणे जिल्हा बँक निवडणुकीच्या तोंडावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी, आंबेगाव तालुक्यातील सहकार क्षेत्रात दांडगा अनुभव असलेले आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखाण्याच्या चेअरमन पदावर असताना सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेले, त्याचबरोबर मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांना कुकडी कालवा सल्लागार समितीवर काम करण्याची संधी वळसे पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आली. आणि त्यानंतर जिल्हा बँकेची निवडणूक पार पडली.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान शिरूर तालुक्यातील ३९ गावं ही आंबेगाव विधानसभा मतदार संघाला जोडली गेली तेव्हापासून मानसिंग पाचुंदकर वळसे पाटील यांचे खंदे समर्थक आहे. त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिरुर आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष पद आहे. शिवाय तालुका व जिल्ह्यातील पक्षाची, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही त्यांनी सहभाग नोंदवला आहे. २०२२ ला होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत मानसिंग पाचुंदकर हे तीव्र इच्छुक आहे. त्यांना देखील सहकार क्षेत्रातील अनुभव आहे त्यामुळे शेतकऱ्यांशी निगडित चासकमान कालवा सल्लागार समितीवर पाचुंदकर यांना संधी देण्यात आली आहे.
दरम्यान २००९ च्या विधानसभा निवडणुकीत शिरूर तालुक्यातील ३९ गावं ही आंबेगाव विधानसभा मतदार संघाला जोडली. त्यावेळी करंदीचे माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र ढोकले हे गृहमंत्री वळसे पाटील यांचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी म्हणून आजतागायत त्यांची ओळख आहे. त्याचबरोबर येणाऱ्या २०२२ च्या पंचायत समितीच्या निवडणुकीत ते इच्छुक होते त्याच धर्तीवर राजेंद्र ढोकले यांना चासकमान कालवा सल्लागार समितीच्या सदस्य पदी गृहमंत्री वळसे पाटील यांच्या माध्यमातून संधी मिळाली आहे.
यामुळे गृहमंत्री वळसे पाटील यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या आणि विश्वासू सहकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या निगडीत असलेल्या कालवा सल्लागार समितीवर काम करण्याची संधी दिल्याने नवनियुक्त सदस्यांचे कौतुक केले जात आहे. यापूर्वी राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी केलेल्या कामगिरीची दखल पक्षाने घेतल्याने ही संधी मिळाली असल्याचे बोलले जाते. त्याचबरोबर आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूकीत अशा कार्यकर्त्यांना विविध ठिकाणी काम करण्याची संधी मिळाल्याने याचा फायदा पक्षाला होणार आहे.
Add Comment