महावितरण विरोधात भाजपचे आंदोलन सुरूच ; आंदोलक आक्रमक
शिरूर, पुणे | महावितरणच्या बेकायदेशीर सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधात भाजपने आंदोलन पुकारले आहे. विजपोल, ट्रान्सफॉर्मर, मनोरा टॉवर ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीत उभारले आहे त्या शेतकऱ्यांना २००३ च्या कायद्यानुसार नुकसान भरपाई आणि भाडे महावितरण कंपनीने देणे अपेक्षित असताना मात्र याउलट शेतकऱ्यांनाच वेठीस धरले जाते या मुद्यावर भारतीय जनता पक्षाच्या उधोग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी शिरूरच्या महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले होते. त्याअनुषंगाने आज (दि. १) रोजी महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके आणि आंदोलकांमध्ये शिरूर येथील महावितरण कार्यालयात बैठक पार पाडली. यावेळी नुकसान भरपाईच्या मुद्यावरून आंदोलकांनी अधिकाऱ्यांना घेरले असता कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके यांनी “शेतकऱ्यांच्या कृषीपंपासाठीच शेतात पोल उभे केले जातात, एक पोलची जागा केवळ एक फूट असते अशा एक फुटाचा शेतकऱ्यांना काय फरक पडतो” असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्याचबरोबर आजपर्यंत अशी नुकसान भरपाईची कोणी मागणी केली नाही आणि नुकसान भरपाई देखील कोणाला दिली नाही तरी देखील आपण सक्षम न्यायाधिकारणाकडे दाद मागू शकता असे उत्तर देखील अधिकाऱ्यांनी दिले आहे.
दरम्यान अडाणी आणि अशिक्षित शेतकऱ्यांचा महावितरणने फायदा घेतला आहे गेल्या पाच महिन्यात कायद्याला धरून एकही उत्तर दिले नाही याउलट परिपत्रकाचा आधार घेऊन पोकळ उत्तरे दिली जातात. शेतकऱ्यांच्या आडून भ्रष्टाचार सुरू आहे, उद्योगाला ज्याप्रकारे पूर्णवेळ विज दिली जाते तशीच आम्हा शेतकरी ग्राहकांना देखील पूर्णवेळ विज देणे आवश्यक आहे, शासनाकडे उत्तर नाही त्यामुळे आजची चर्चा ही निष्फल ठरली असल्याने अधिकाऱ्यांनी किमान एक महिना वेळ घेऊन शेतकऱ्यांकडे थकबाकी कशी त्याचे उत्तर द्यावे आणि नियमानुसार थकबाकी असेल तर ती पूर्ण भरण्याची जबाबदारी मी घेतो असे मत पाचंगे यांनी व्यक्त केले.
दरम्यान पाचंगे यांनी आक्रमक होत शेतकरऱ्यांचे जर विजजोड बंद केले तर आम्ही कर्मचारी परत माघारी येऊ देणार नाही. आमच्या शेतात जायला यायला महावितरणला अधिकार नाही असा इशारा दिला. त्यामुळे आगामी काळात हे आंदोलन आणखी चिघळण्याची चिन्हे या बैठकीतून दिसून आली. यावेळी आंदोलकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न अधिकारी राजेंद्र येडके यांनी केला. नोटीस मोबाईलद्वारे दिले आहे तरी देखील पुन्हा नोटीस दिले जाईल, चुकीचे बिल आले असेल तर भरू नका, कायदा हातात घेऊ नका अशा प्रकारची विनंती येडके यांनी केली. परंतू आंदोलकांचे या बैठकीत समाधान न झाल्याने आगामी काळात याहून अधिक तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा संजय पाचंगे यांनी दिला आहे.
या बैठकीला उपकार्यकरी अभियंता नितीन महाजन, सोमनाथ माने यांसह विक्रम पाचूंदकर, भगवान शेळके, आबासाहेब सरोदे, कैलास सोनवणे, नितीन पाचर्णे, राहुल गवारे, रोहित खैरे, बाबुराव, पाचंगे, विजय नरके, मितेश गाडिया, वर्षा काळे, सिमा पवार, केशव लोखंडे, राजू शेख, प्रकाश धाडीवाल, किरण नवले, सचिन राक्षे, नवनाथ भुजबळ, लाला ढवळे, अंकुश जाधव, उमेश शेळके, अशोक शेळके. यांसह अनेक शेतकरी उपस्थित होते.
Add Comment