ताज्या घडामोडी शिरूर

महावितरण दोन पाऊल मागे, वीज कनेक्शन तोडणार नाही…!

शिरूर, पुणे | महावितरणच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या संजय पाचंगे यांनी सत्याग्रह आंदोलन पुकारले आहे. त्याअनुषंगाने काल (दि. १ फेब्रुवारी) रोजी महावितरणचे अधिकारी आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यात संजय पाचंगे यांनी कृषी पंपाचे विज कनेक्शन तोडणे थांबवा. विजपोल, ट्रान्सफॉर्मर, मनोरा टॉवरची नुकसान भरपाई द्या. आणि २००५ च्या शासन निर्णयानुसार सवलतीच्या दराने दिलेल्या कृषी विजबिलांचा हिशोब द्या. या प्रमुख मागण्यांविषयी चर्चा केली. मात्र या चर्चेत आंदोलकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे कोणत्याही मागणीवर ठोस निर्णय झाला नसल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी १५ दिवसांची मुदत आंदोलक संजय पाचंगे यांच्याकडे मागितली आहे. या मुदतीच्या कार्यकाळात कोणत्याही शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणार नसल्याचे पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे महावितरणने दोन पाऊले मागे टाकल्याने या आंदोलनाचे हे पहिले यश असल्याचे पाचंगे यांनी सांगितले.

अडाणी आणि अशिक्षित शेतकऱ्यांचा महावितरणने फायदा घेतला आहे गेल्या पाच महिन्यात कायद्याला धरून एकही उत्तर दिले नाही याउलट परिपत्रकाचा आधार घेऊन पोकळ उत्तरे दिली जातात. शेतकऱ्यांच्या आडून भ्रष्टाचार सुरू आहे, उद्योगाला ज्याप्रकारे पूर्णवेळ विज दिली जाते तशीच आम्हा शेतकरी ग्राहकांना देखील पूर्णवेळ विज देणे आवश्यक आहे, शासनाकडे उत्तर नाही त्यामुळे कालच्या बैठकीतील चर्चा ही निष्फल ठरली असल्याने अधिकाऱ्यांनी किमान एक महिना वेळ घेऊन शेतकऱ्यांकडे थकबाकी कशी त्याचे उत्तर द्यावे आणि नियमानुसार थकबाकी असेल तर ती पूर्ण भरण्याची जबाबदारी मी घेतो असे मत पाचंगे यांनी व्यक्त केले होते. त्याअनुषंगाने महावितरण विभागाने दोन पाऊले मागे टाकत १५ दिवसांची मुदत घेऊन १५ दिवसांत आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे व माहिती देऊन आपले समाधान होईपर्यंत आपल्या बरोबर चर्चा केली जाईल असे पत्रात नमूद केले आहे.

कालच्या बैठकीत पाचंगे यांनी आक्रमक होत शेतकरऱ्यांचे जर विजजोड बंद केले तर, आम्ही कर्मचारी परत माघारी येऊ देणार नाही. आमच्या शेतात जायला यायला महावितरणला अधिकार नाही असा इशारा दिला. त्यामुळे आगामी काळात हे आंदोलन आणखी चिघळण्याची चिन्हे या बैठकीतून दिसून आली होती. यावेळी आंदोलकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न अधिकारी राजेंद्र येडके यांनी केला होता. आंदोलन चिघळले जाऊ नये या दृष्टीने महावितरणने सकारात्मक पाऊले उचलली असल्याचे दिसून येत आहे.

error: Copying content is not allowed!!!