खेड, पुणे | खेड तालुक्यातील राजकारणाची दखल वरिष्ठ नेत्यांना देखील घ्यावी लागली होती, आगामी काळात देखील खेड तालुक्याचे राजकारण चांगलेच तापणार असल्याचे चित्र प्रथमदर्शनी पहायला मिळत आहे. शिवसेना – राष्ट्रवादी खेड तालुक्यात अजिबात जुळवून घ्यायला तयार नाही. त्यातच आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्याअगोदरच इच्छुक उमेदवार तयारीला लागल्याचे चित्र खेड तालुक्यात पाहायला मिळत आहे.
काळूस – सांडभोरवाडी जिल्हा परिषद गटाची समीकरणे गट रचनेवर अवलंबून आहेत. याच गटात २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेचे बाबाजी काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अरुण थिगळे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. २०१७ च्या निवडणुकीनंतर खेड तालुक्यातील या गटात अनेक फेर बदल झाले. शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्या सुनीता सांडभोर या राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाल्या आहेत. अद्याप जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे आरक्षण जाहीर झालेले नाही, निवडणूक कार्यक्रम जाहीर नाही तोच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मीच जिल्हा परिषदेचा उमेदवार असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीकडून बाजार समितीच्या माजी उपसभापती सुरेखा टोपे, अरुण थिगले, काळूस गावचे माजी सरपंच गणेश पवळे, दीपक लोणारी यांच्यासह अनेक आजी माजी पदाधिकारी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेच्या देखील इच्छुकांची यादी मोठीच आहे यामध्ये ज्योती अरगडे, गणेश अरगडे यांच्या नावाची देखील चर्चा सुरू असली तरी विध्यमान जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांचा आलेख पाहता पुन्हा शिवसेना पक्ष विध्यमान जिल्हा परिषद सदस्य काळे यांना संधी देणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर काँग्रेसचे माजी पंचायत समिती उपसभापती सतीश राक्षे आणि भोसे गावचे माजी उपसरपंच योगेश पठारे यांनी देखील मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. या जिल्हा परिषदेच्या गटात भारतीय जनता पार्टीची ताकत कमजोर असली तरी तालुका अध्यक्ष शांताराम भोसले यांचा जुना गट असल्याने भाजप ही या गटात उमेदवार देणार हे मात्र नक्की.
दरम्यान राज्यात तीन पक्षांचे सरकार स्थापन झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात हे तीनही पक्ष एकत्र येत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी निवडणूक होते की सर्व पक्ष वेगवेगळे निवडणुकीच्या रिंगणात उतरतात हे येणारा काळच ठरवेल मात्र तालुक्यातील राजकीय समीकरणे पाहता महाविकास आघाडी तालुक्याच्या राजकारणात दिसून येईल यात शंकाच आहे.
एकीकडे अनेक भावी उमेदवार मीच पक्षाचा उमेदवार असल्याचे भासवत असले तरी खेड तालुक्यातील पूर्वीचे सात गट आहे यावेळी मात्र आणखी एका गटाची भर पडणार आहे. जिल्हा परिषद गट रचना अद्याप झालेली नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. येत्या काळात कोणाला कोणता गट सोयीस्कर जाणार याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.
Add Comment