शिरूर, पुणे | २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने पराभव झाल्यानंतर प्रकृतीच्या कारणांमुळे बाबुराव पाचर्णे तालुक्याच्या राजकारणातून काही दिवस बाहेर राहिले. याकाळात तीन पक्षाचे राज्यात सरकार स्थापन झाले. दरम्यान याच महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शिरूर भाजपच्या वतीने अनेक आंदोलने कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे आणि उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. बाबुराव पाचर्णे यांच्या अनुपस्थितीत या दोघांनी तालुक्यात भाजप जिवंत ठेवण्याचं काम केलं. आता पुन्हा माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांनी तालुक्याच्या राजकारणात जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून एन्ट्री केली. आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून भाजपचे महावितरण विरोधात सुरू असलेले आंदोलन आणि बुधवार (दि. २ फेब्रुवारी) रोजी जयेश शिंदे यांच्या माध्यमातून अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात झालेला प्रवेश. त्यामुळे शिरूर -हवेलीतील भाजपा आता कात टाकत आहे की काय असेच काहीसे चित्र निर्माण झाले आहे.
माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार अशोक पवार यांनी दारुण पराभव केला. मात्र त्याच्या अगोदर अशोक पवार यांनी शिरूर तालुक्याच्या सहकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थावर वर्चस्व प्रस्थापित करत नेतृत्व पुन्हा सिद्ध केले होते. त्याचाच फायदा पवारांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत झाला. त्यानंतर राज्यात तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आणि विरोधात केवळ भाजप हाच पक्ष उरला. शिरूर तालुक्यात देखील काँग्रेस आणि शिवसेनेला बरोबर घेण्यात अशोक पवार यशस्वी ठरले. केवळ बोटावर मोजण्याइतके शिवसेनेचे पदाधिकारी सोडले तर स्थानिक शिवसेना ही आमदार पवार यांच्याच सोबत पहायला मिळते.
परंतु भाजपा मात्र प्रखर विरोध करताना पहायला मिळत आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील बहुतांश आमदार बिनविरोध जिल्हा बँकेवर संचालक म्हणून निवडून गेले. मात्र अशोक पवार यांना निवडणुकीला सामोरे जावे लागले. मोठ्या फरकाने पवार यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विजय मिळवला असला तरी, आमदार अशोक पवार यांचे बिनविरोध निवडून जाण्याचे स्वप्न भाजपने धुळीस मिळवले. आबासाहेब गव्हाणे यांनी आमदार पवार यांच्या विरोधात निवडणूक लढल्याने पवार स्वतःच्या निवडणुकीत अडकून पडले आणि पवारांचे कट्टर विरोधक समजले जाणारे प्रदीप कंद यांनी देखील जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जोरदार विजय मिळवला.
प्रदीप कंद यांचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याशी असलेला दांडगा संपर्क शिरूर -हवेलीच्या राजकारणासाठी भाजपला फायद्याचा ठरणार आहे. आमदार अशोक पवार यांच्या विरोधात कुरघोडीचे राजकारण करण्यापेक्षा आता भाजपा आपली ताकद वाढविण्यात व्यस्त आहे. वाघोली हे मोठी मतदार संख्या असलेले गाव पुणे महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट झाले आहे. माजी उपसरपंच संदीप सातव यांनी पालिकेच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. राष्ट्रवादीला रोखण्यासाठी शहरातील भाजपची मोठी मदत होईल. आगामी काळातील निवडणुका शिरूर – हवेलीतील भाजपा मोठ्या ताकदीने लढणार हे मात्र स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे हळू हळू कात टाकणाऱ्या भाजपला आगामी निवडणुकीत किती यश मिळते हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
Add Comment