केंदूर, पुणे | गृहमंत्री दिलीप वळसे पाटील केंदूर – पाबळ जिल्हा परिषद गटातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटन प्रसंगी गावभेट दौऱ्यावर होते. दरम्यान रात्री उशिरा केंदूरमध्ये आल्यानंतर उद्योजक प्रमोद पऱ्हाड यांनी गावच्या इच्छुक उमेदवाराला राष्ट्रवादी पक्षाची उमेदवारी द्या अशी मागणी केल्यानंतर सूत्रसंचालन करणाऱ्या रामभाऊ साकोरे यांनी “अपना हक तो बनता है…!” असा दावा करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
आतापर्यंतच्या सर्वच निवडणुकामाध्ये गावातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे ताकद उभी केली आहे. गेल्यावेळी देखील केंदूर गावाला जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा होती. मात्र पाबळला पुन्हा दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाली केंदूरकर काहीसे नाराज झाले, परंतु ठीक आहे आमच्या केंदूर गावच्या कन्येला अर्थात सविता बगाटे यांना उमेदवारी मिळाली त्यामुळे समजू शकलो. दरम्यान आजपर्यंत केंदूर- पाबळ गटातील केंदूर गणात कधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पंचायत समिती सदस्य होऊ शकला नाही मात्र सविता पऱ्हाड यांच्या रूपाने या गटाला राष्ट्रवादी पक्षाचा पंचायत समिती सदस्या मिळाल्या. त्यामुळे आगामी काळात आमच्या केंदूर गावातून ‘अ’ इच्छुक असेल, ‘ब’ इच्छुक असेल किंवा ‘क’ इच्छुक असेल त्याचा ताळमेळ आपण घाला किंवा आम्ही गावातील मंडळी घालू, परंतु यावेळी जिल्हा परिषदेची उमेदवारी ही आमच्या गावलाच मिळावी. अशी अपेक्षा प्रमोद पऱ्हाड यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. यावेळी इतर गावातील इच्छुक उमेदवारांच्या भुवया मात्र उंचावलेल्या पहायला मिळाल्या.
अपना हक तो बनता है…!
प्रमोद पऱ्हाड यांनी केंदूरला उमेदवारी मिळावी अशी मागणी केल्यानंतर सूत्रसंचालन करत असणारे रामभाऊ साकोरे यांनी देखील पऱ्हाड यांचा तोच धागा पकडून “अपना हक तो बनता है..!” असं म्हणत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतल्याने सर्वांनी टाळ्या वाजवत अनुमती दिली. त्याचबरोबर गृहमंत्री वळसे पाटील यांना उद्देशून आम्ही कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसलोय त्यामुळे आम्ही जे जे मागू ते ते मिळणार आहे अशाही भावना बोलताना साकोरे यांनी व्यक्त केल्या.
उमेदवारीच्या नादात अडकून पडू नका – गृहमंत्री वळसे पाटील
दरम्यान गृहमंत्री वळसे पाटील यांनी आपल्या भाषणात बोलताना प्रमोद पऱ्हाड यांच्या मागणीचा धागा पकडून निवडणूक अजून दूर आहे त्याबाबत आत्ताच चर्चा नको, उमेदवारीसाठी गावागावाने अडकून पडू नका जेव्हा उमेदवारी द्यायची वेळ येईल तेव्हा आपण पाहू आत्ताच याबाबत चर्चा नको असं म्हणत वळसे पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या उमेदवारीबाबतच्या चर्चेला बगल दिली.
त्यामुळे येत्या काळात केंदूरकर जिल्हा परिषदेच्या उमेदवारीसाठी ठाम राहणार असल्याचे दिसून येते. केंदूर हे सर्वाधिक मतदार संख्या असलेले गाव आहे. गेल्या दोन वेळा दावा करून देखील केंदूरला उमेदवारीपासून बाजूला राहावं लागलं असले तरी यावेळी मात्र केंदूरकर उमेदवारी मिळवण्यासाठी एकवटले आहेत. जिल्हा परिषदेच्या उमेदवारीवर या निवडणुकीत केंदूरचाच हक्क आहे त्यामुळे गावकारभारी ते सर्वसामान्य नागरिकांच्यात एकच चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे “अपना हक तो बनता है…!”
Add Comment