खेड, पुणे : पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट आणि गण रचनेचा प्रारूप नकाशा येत्या दोन दिवसात स्पष्ट होणार आहे. मात्र त्या आधीच खेड तालुक्यात राजकीय वातावरण तापतलेले पाहायला मिळत आहे. प्रारूप नकाशा अधिकृत जाहीर होण्या आधीच सोशल मीडियावर खेड तालुक्यातील गट आणि गण रचनेचा नकाशा व्हायरल होत आहे. त्या नकाशाचा आधार घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आनंदात दिसून येत आहेत तर इतर पक्षाचे इच्छुक उमेदवार मात्र चिंतेत असून अधिकृत नकाशाची वाट पाहत आहे.
राज्यात सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीतील तिनही पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहेत मात्र एकाच पक्षाला गट आणि गण रचनेत झुकते माप मिळाले असल्याच्या चर्चांना खेड तालुक्यात उधाण आले आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दिवंगत आमदार सुरेश गोरे यांचा पराभव करत दिलीप मोहिते पुन्हा आमदार झाले खरे परंतु पुन्हा तालुक्यातील राजकारण आमदार दिलीप मोहिते विरुद्ध इतर असेच काहीसे पाहायला मिळत आहे. सध्या तालुक्यातील सर्वच संस्थांवर आमदार दिलीप मोहिते यांच्या गटाचे निरनिवाद वर्चस्व आहे. हीच गोष्ट विरोधकांना खटकते त्यामुळे आगामी काळात पुन्हा आमदार दिलीप मोहिते विरुद्ध इतर असे चित्र पाहायला मिळाले तर नवल वाटायला नको.
खेड पंचायत समितीच्या सभापती निवडीवरून झालेल्या राजकारणाची दखल राज्यातील वरिष्ठ नेत्यांना घ्यावी लागली होती. त्यामुळे आगामी काळात तालुक्यातील राजकारण चांगलेच तापणार असल्याचे प्रथमदर्शनी पाहायला मिळत आहे. त्यातच राज्यात सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असणारे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांचं मात्र तालुक्यातील राजकारणातील वैर सर्वांनाच परिचित आहे.
सध्या जिल्हा परिषदेचे ७ सदस्य तर पंचायत समितीचे १४ सदस्य कार्यरत आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे २, शिवसेना ३ व भाजपचे २ जिल्हा परिषद सदस्य आहेत. तर पंचायत समितीसाठी शिवसेना ८, राष्ट्रवादी ४, काँग्रेस १ आणि भाजप १ अशी बलाबल असूनही सध्या पंचायत समितीवर मात्र आमदार दिलीप मोहिते यांचेच वर्चस्व असून दोन जिल्हा परिषद सदस्यांच्या जीवावर मोहिते यांनी तालुक्यात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद ही खेचून आणले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या संभाव्य नकाशाच्या आधारे आमदार मोहिते यांनी विरोधकांना गट आणि गण रचनेच्या माध्यमातून बाजी मारली असली तरी विरोधक मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकी प्रमाणे एक होऊ शकतात हे ही तितकच खरं. जिल्हा परिषदेच्या गट रचनेत वाढ झाली असून तालुक्यातून ७ ऐवजी ९ सदस्य जिल्हा परिषदेत दिसून येणार आहेत. मात्र या निवडणुकीत तालुक्यातील अनेक मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार असून अनेकांना स्व पक्षातून तिकीट मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.
Add Comment