आंबेगाव राजकीय शिरूर

“चलो साहेबांच्या गाडीत जेन्ट्स नॉट अलाऊड” – महिला पदाधिकारी आक्रमक.

शिरूर, पुणे | त्याचं झालं असं की, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील दोन दिवस मतदार संघातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटन प्रसंगी दौऱ्यावर होते. शिरूरच्या ३९ गावातील केंदूर – पाबळ आणि रांजणगाव – कारेगाव जिल्हा परिषद गटातील हा दौरा होता. एखाद्या गावात गेल्यावर कार्यक्रम झाल्यानंतर मंत्री महोदय पुढच्या गावात निघाले की, साहेबांच्या गाडीत बसण्यासाठी पुढाऱ्यांची धावपळ पाहायला मिळायची जो तो आपली जागा पकडण्यासाठी साहेबांच्या अगोदरच गाडीत दाखल व्हायचा. अर्थात या पुढाऱ्यांच्या आलिशान गाड्या ताफ्यात होत्याच मात्र साहेबांशी माझं किती सख्य आहे हे लोकांना दाखविण्यासाठी अनेक नामांकित पदाधिकाऱ्यांची तारांबळ उडत होती.

हे सगळं दोन महिला पदाधिकारी पाहत होत्या त्यानंतर एका गावात तर एक विनोदी प्रकारच घडला, त्याचं झालं असं की, साहेबांच्या गाडीत बसण्यासाठी नामांकित पुढारी धाव घेत होते, काही गाडीत बसले होते तर काही बसत होते अन् अचानक एक महिला पदाधिकारी गाडीचा दरवाजा पकडून आक्रमक होत बरसल्या “आमच्या भागात तरी आम्हाला साहेबांच्या गाडीत बसुद्या की, चलो साहेबांच्या गाडीत जेन्ट्स नॉट अलाऊड” अशी कोपरखळीच लगावली. तेव्हा मात्र या पुढाऱ्यांची पुन्हा तारांबळ उडाली. दुसरी गाडी शोधायला त्यांच्या नजरा सैरभैर झाल्या. हे होऊनही दुसऱ्या गावातील कार्यक्रम उरकल्यावर पुन्हा असच साहेबांच्या गाडीत बसण्यासाठी पुढाऱ्यांची धडपड सुरूच होती.

साहेबांच्या गाडीत बसल्यावर अतिउत्साही युवा नेते व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. खरं तर अशा प्रकारचे व्हिडीओ पाहून लोकं आपली खिल्ली उडवतात हे या अतिउत्साही कार्यकर्त्यांच्या लक्षात येत नसेल का.? स्वतःला युवा नेते म्हणवून घेणारे युवा कारभारी अशा प्रकारच्या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होताना पाहायला मिळत आहेत.

दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी देखील काही महिलांनी साहेबांच्या गाडीचा ताबा मिळवला अन् खडसावून हे पुढारी गाडीच्या बाहेर काढले आणि पुन्हा गाडीत बसण्यासाठी धडपड करणाऱ्या पुढाऱ्यांना ब्रेक लावला. काही वर्षांपूर्वी एका केंद्रीय नेत्याच्या गाडीत बसण्यासाठी एक राज्यातील नेता धडपड करत होता. मात्र त्या मंत्र्यांचे अंगरक्षक त्या नेत्याला गाडीत बसून देत नव्हते, तेव्हा तो नेता अक्षरशः वैतागून अंगरक्षकाबरोबर वाद घालत होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. नेटकरी देखील तो व्हिडिओ हसून हसून पाहत होते. अगदी तसच काहीसं चित्र उद्या या भागात पहायला मिळाले तर नवल वाटायला नको.

खरं तर या प्रमुख पुढाऱ्यांनी ज्या त्या गावातील लोकांना मंत्री महोदयांशी संपर्क साधण्यासाठी संधी द्यायला हवी, ज्या त्या गावातील स्थानिक पुढाऱ्यांना महत्त्व द्यायला हवे मात्र साहेबांच्या भोवती मोजक्याच पुढाऱ्यांचा गराडा असल्याने महिलांची कुचंबणा होते, स्थानिक पुढारी निराश होतात हे नेत्यांच्या कधी लक्षात येणार असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

error: Copying content is not allowed!!!