मंचर, पुणे | तरुणाईमध्ये सर्वात जास्त चर्चिला जाणारा वेलेन्टाइन आठवडा सद्या सुरू आहे. या आठवड्यातील प्रॉमिस डे नुकताच शुक्रवारी (११ फेब्रुवारी) रोजी होऊन गेला. योगायोगाने या दिवशी खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी मतदारांना निवडणूकीपूर्वी दिलेल्या वचनाची आठवण झाली. जे वचन अर्थात प्रॉमिस डॉ कोल्हे यांनी मतदारांना दिले होते ते पूर्ण करण्याची संधी या प्रॉमिस डेच्या दिवशी चालून आली होती. मात्र डॉ. कोल्हे हे प्रॉमिस पूर्ण करू शकले नसल्याच्या चर्चा नेटकरी करत आहेत.
शिरूर लोकसभा मतदार संघ हा बैलगाडा शर्यतीच्या राजकारणावर गेल्या अनेक वर्षांपासून अवलंबून असलेला पाहायला मिळतो. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी याच राजकारणावर गेल्या तीनही लोकसभा निवडणुका जिंकून इतिहास घडविला. मात्र त्याच इतिहासाला डॉ. अमोल कोल्हे यांनी छेद देऊन शिरूर लोकसभा मतदार संघावर पकड मिळविली. आणि पहिल्याच निवडणूकीत घवघवीत यश मिळवले. परंतु याच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान डॉ. कोल्हे यांनी मतदारांना एक प्रॉमिस अर्थात वचन दिले होते की, “ज्या दिवशी बैलगाडा शर्यत सुरू होईल त्या दिवशी हा तुमचा पठ्ठ्या पहिल्या बारी म्होरं घोडी धरणार म्हणजे धरणार”. दरम्यान शुक्रवारी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या लांडेवाडी गावात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. त्या घाटात पहिली बारी पार पडली खरं मात्र त्या बारी पुढे घोडी धरण्यासाठी बैलगाडा घाटात खासदार डॉ कोल्हे उपस्थित नव्हते. त्यामुळे डॉ. कोल्हे यांना मतदारांना दिलेले प्रॉमिस पूर्ण करण्याची संधी प्रॉमिस डेच्याच दिवशी उपलब्ध झाली असतानाही ती ते पूर्ण करू शकले नाही.
खरं तर डॉ. कोल्हे हे संसदीय अधिवेशनात होते त्यामुळे कदाचित त्यांना ही संधी गमवावी लागली असली तरी, मतदार संघातील प्रश्न आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर बोट ठेवण्याचे काम संसदेत डॉ. कोल्हे योग्य प्रकारे करत आहेत. त्यामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात डॉ. कोल्हे यांनी नावलौकिक कमवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट संसदेत टोकणारे खासदार म्हणून डॉ. कोल्हे यांची ख्याती आहे. दरम्यान प्रॉमिस डेच्या दिवशी “शिरूरच्या जनतेचा प्रत्येक प्रश्न सोडविण्यासाठी, मतदारसंघातील प्रत्येक युवकाला ताकद देण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. गेली दोन वर्षे मी हा शब्द प्रामाणिकपणे निभावत आलोय व यापुढील काळातही संसदेत मी त्यांचे प्रश्न सातत्याने मांडत राहीन, हेच माझं शिरुरच्या जनतेला प्रॉमिस” अशा प्रकारचे एक अनोखं प्रॉमिस सोशल मीडियाच्या माध्यमातून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेलं आहे.
Add Comment