राजकीय शिरूर संपादकीय

केंदूर – पाबळ गटातील लढत रंगतदार..!

जोरदार शक्तिप्रदर्शन, अनेक मुद्यांमुळे निवडणूक चर्चेत.

पाबळ | शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागातील महत्वाचा जिल्हा परिषद गट म्हणून केंदूर- पाबळ जिल्हा परिषद गट ओळखला जातो. १४ गावचा पाणी प्रश्न, पक्षीय समीकरण, सामाजिक कार्य, देवदर्शन यात्रा या प्रमुख मुद्यांवर ही निवडणूक होणार असल्याचे बोलले जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अचानक जाहीर केलेल्या उमेदवारी, त्यानंतर भाजपची एन्ट्री यामुळे हा गट अनेक अर्थाने चर्चेत राहिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या तीनही उमेदवारी देताना पक्षाने आर्थिक परिस्थितीची गोळाबेरीज केली. गटातील महिलांना देवदर्शन घडविणाऱ्या त्याचबरोबर कोविड काळात मोफत कोरोना सेंटर चालवलेल्या प्रफुल्ल शिवले यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली. तर या गटात मोठा जनसंपर्क असलेल्या प्रकाश पवार यांच्या पत्नी वंदना प्रकाश पवार यांना पाबळ गणातून उमेदवारी दिली. त्याचबरोबर केंदूर गणातून राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून सातत्याने युवकांच्या संपर्कात असलेले सनी थिटे यांच्या पत्नी सुचेता थिटे यांना उमेदवारी देण्यात आली. तर दुसरीकडे भाजपने सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले. दोन्ही बाजूच्या उमेदवारांनी आपली आपली ताकद दाखवत उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आर्थिक दृष्टीने ताकदवान असलेल्या इच्छुकांना संधी दिली असली, तरी भाजपने मतदारांच्या बेरजेचे राजकारण केले आहे. केंदूर, पाबळ, धामारी, खैरेवाडी, खैरेनगर, हिवरे यांसह १४ गावांत फेब्रुवारी, मार्च अखेर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते आणि याच समस्यांची जाण असलेल्या इच्छुक उमेदवारांना संधी देऊन राष्ट्रवादी पक्षाची भाजपने मोठी कोंडी केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून १४ गावांच्या पाणी प्रश्नासाठी जनआंदोलन उभे राहिले. याची सुरुवात केंदूकरांनी केली. केंदूरच्या भूमीतून पाणी प्रश्नावर उद्रेक झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असताना आमदार, खासदार यांना गावबंदीचा इशारा देखील याच केंदूरमधून देण्यात आला होता. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत मंत्र्यांच्या दालनात अनेक बैठका या संदर्भात झाल्या मात्र ठोस उपाययोजना अद्यापही झालेली नाही.

दरम्यान शासन स्तरावर पाण्यासाठी कोणतीच भूमिका स्पष्ट होत नसताना सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या विकास गायकवाड यांनी, स्वखर्चाने मागेल त्या गावाला टँकरने पाणी पुरवठा केला. ज्या ग्रामपंचायत सदस्यांकडून पाण्याच्या टँकरची मागणी येईल त्यांच्या त्या – त्या वार्डमध्ये मोफत टँकर व्यवस्था करण्यात आली. सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून सुसंस्कृत ओळख असणाऱ्या विकास गायकवाड यांनी या भागातील ग्रामस्थांची तहान भागावण्याचं काम केले.

तर दुसरीकडे हिवरे गावच्या शेतकाऱ्यांसाठी दिलासादायक चित्र उभे करणाऱ्या दीपक खैरे यांची देखील वेगळी कहाणी आहे. सुरुवातीला मांदळवाडी गावच्या शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन ओलिताखाली आणण्यासाठी स्वतःच्या खिशाचा आधार घेऊन दोन कोटी रुपये खर्चून पाईपलाईनद्वारे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिले. तशाच प्रकारची कृषी सिंचन योजना धामारी गावासाठी देखील उभी करण्यात आली. हजारो एकराचे शेतीचे प्लॉट ओलिताखाली आणण्यासाठी केलेला दीपक खैरे यांचा संघर्ष वाखाणण्याजोगी आहे. तर केंदूर गणातून भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्याच्या पत्नीला अर्थात आशा संपत साकोरे यांना उमेदवारी दिली गेली.

दोन्ही बाजूने प्रचाराची जोरदार तयारी चालू आहे. वढू बुद्रुक, आपटी, वाजेवाडी, पिंपळे जगताप या भागात वलय असलेल्या प्रफुल्ल शिवले यांना त्या भागातून मतदार किती स्वीकारतात हे पाहणं महत्त्वाचे आहे तर केंदूर, पाबळ, धामारी, मुखई, जातेगाव, करंदी मोठी मतदार संख्या असलेल्या गावांत विकास गायकवाड यांना मतदार किती साथ देतात यावर पुढचे चित्र पाहायला मिळेल.

error: Copying content is not allowed!!!