वळसे पाटील विरुद्ध प्रदीप कंद राजकीय सामना.
शिरुर | राज्यात सुसंस्कृत राजकारणी म्हणून ओळख असलेले माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ग्रहण लागले आहे. १५ वर्षे सोबत असलेले अनेक सहकारी साथ सोडून भाजपमध्ये सामील होत आहेत तर, अनेकांनी या अगोदरच वाऱ्याची हवा ओळखून भाजपचा रस्ता धरला आहे. त्यामुळे या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत कधी नव्हे ते शिरुरच्या ४२ गावांत भाजपने भक्कम पाय रोवले आहेत. त्यामुळे वळसे पाटील विरुद्ध प्रदीप कंद असा राजकीय सामना पाहायला मिळणार आहे.
२००९ साली शिरुर तालुक्याचे दोन विधानसभा मतदारसंघात विभाजन झाले तत्कालीन शिरूरची ३९ गावं आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला जोडले गेले. शरद पवार यांच्या विचारांचा प्रभाव या भागात असल्याने वळसे पाटील यांना अनेक निवडणुकांमध्ये याचा मोठा फायदा झाला. या भागातील मातब्बर नेते वळसे पाटील यांच्या वळचणीला सामील झाले. अशाच प्रकारे २००९ साली संपूर्ण शिरुर तालुका बारामती लोकसभा मतदारसंघातून वगळून पूर्वीचा खेड आणि आताचा शिरुर लोकसभा मतदारसंघ नव्याने तयार झाला. या लोकसभा मतदारसंघात तत्कालीन शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे वर्चस्व होते. त्यामुळे या भागात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळत होता.
परंतु आता चित्र बदलले आढळराव पाटील राष्ट्रवादीत गेले तर शिवसेना पक्षाचे दोन पक्ष तयार झाले, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देखील दोन पक्ष तयार झाले. वळसे पाटील विरुद्ध आढळराव पाटील असा संघर्ष पूर्वी होता, आता तो संघर्ष नामशेष झाला. मात्र तेच कार्यकर्ते अजूनही एकमेकांच्या विरोधात संघर्ष करत आहेत. फरक फक्त एवढाच नेतृत्व बदलले आहेत. वळसे पाटील यांच्याकडून दुखावले गेलेले मातब्बर पुढारी आता भाजपच्या आश्रयाला गेले आहेत.
वळसे पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्याबरोबर भाजपच्या सत्तेत जाऊन बसले, म्हणून मतदारसंघात वळसे पाटील यांच्या विरोधात रान पेटवणारे मातब्बर पुढारी आता भाजपच्या उमेदवारी घेऊन निवडणूक लढवत आहेत. तर दुसरीकडे अजित पवार आणि शरद पवार या दोघांचे पक्ष एकत्रित निवडणूक लढवत आहे. त्यामुळे कार्यकर्ते मात्र कोणता झेंडा हाती घ्यायचा याच संभ्रमात आहेत.
४२ गावांत तीन जिल्हा परिषद गट आहेत. या तीनही गटात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पूर्वी पाहायला मिळत होता नंतर राष्ट्रवादी (अ. प.) विरुद्ध राष्ट्रवादी (श. प) असा संघर्ष झाला आता या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा संघर्ष पाहायला मिळेल. भारतीय जनता पक्षाने मात्र या ४२ गावांमध्ये मोठी ताकद उभी करून निवडून येण्याची ताकद असलेल्या उमेदवारांना पक्षात सामील करून घेतले आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी वळसे पाटलांच्या मतदारसंघात भाजपचा मोर्चा वळवला आहे. वळसे पाटील यांच्या गटातील अनेक सहकारी हळूहळू भाजपच्या गळाला लावून वळसे पाटील यांना प्रदिप कंद यांनी भाजपच्या साहाय्याने घेरले आहे. या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत प्रदीप कंद विरुद्ध वळसे पाटील असा सामना पाहायला मिळू शकतो एवढं मात्र नक्की.











Add Comment