रांजणगाव गणपती (प्रतिनिधी) : शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती परिसरातून एकाच कुटुंबातील तिघे जण संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. १० मार्च २०२६ रोजी राहत्या घरातून बाहेर पडलेले हे तिघे परत न आल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आहेत.
बेपत्ता झालेल्यांमध्ये मनोज महादेव गायवळ, त्यांची पत्नी अक्षदा मनोज गायवळ तसेच त्यांची अवघी तीन महिन्यांची मुलगी कु. वेदिका मनोज गायवळ यांचा समावेश आहे. घरातून बाहेर पडताना त्यांनी कुठे जाणार असल्याची कोणतीही स्पष्ट माहिती कुटुंबीयांना दिली नव्हती, अशी माहिती समोर येत आहे. घटनेनंतर कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्रपरिवार तसेच आसपासच्या गावांमध्ये चौकशी करत मोठ्या प्रमाणात शोधमोहीम राबवली. मात्र, अनेक दिवस उलटूनही तिघांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर निराश झालेल्या कुटुंबीयांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.
तक्रार दाखल होताच पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत शोधमोहीम सुरू केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे, नातेवाईक व ओळखीच्या व्यक्तींची चौकशी करणे तसेच विविध ठिकाणी माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार अजित पवार करत असून, पोलीस निरीक्षक वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुंडे व इतर कर्मचारी तपासात सहभागी आहेत.
दरम्यान, एका कुटुंबातील तिघे जण एकाच वेळी बेपत्ता झाल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले असून, पोलिसांकडून सर्व शक्यतांचा तपास केला जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
तसेच, संबंधित तिघांबाबत कोणतीही माहिती, हालचाल किंवा संशयास्पद बाब आढळल्यास नागरिकांनी तात्काळ रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याशी किंवा संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.











Add Comment