आंबेगाव खेड जुन्नर पुणे राजकीय शिरूर हवेली

आढळराव पाटलांची युवा फौज सज्ज…?

मंचर, पुणे | माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी रविवार (२० फेब्रुवारी) रोजी शिरूर लोकसभा मतदार संघातील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत आगामी काळातील निवडणुकांची रणनीती ठरवली असल्याची चर्चा रंगली आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पुन्हा नव्या जोमाने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत युवा सहकाऱ्यांच्या जोरावर आगामी काळात शिवसेनेची ताकद दाखवून देण्यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी युवा फौज सज्ज केली आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच पक्षाला आलेली मरगळ दूर करण्यासाठी आणि पदाधिकांऱ्यांच्या नियुक्त्या करून शिरूर लोकसभा मतदार संघात शिवसेनेची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने आढळराव पाटील यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या काही दिवसांत युवासेना प्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत भीमाशंकर अथवा नाणेघाट याठिकाणी भव्य शिबिराचे आयोजन करणार असल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले.

युवासेना ही शिक्षण, आरोग्य व रोजगार या क्षेत्रात भरीव काम करणारी संघटना आहे. जिल्हा पदाधिकाऱ्यांनी तालुका व गावनिहाय युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून पक्षवाढीसाठी विशेष मेहनत घ्यावी. युवासैनिकांनी सरकारी योजना समजावून घेत लोकांपर्यंत पोहोचवाव्या, समाजोपयोगी कामे करावी, लोकांमध्ये एकरूप व्हावे. युवासेनेत विविध क्षेत्रात आपल्या कामगिरीचा ठसा उमटवणाऱ्या तरुणांची फौज आहे. माझ्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्याचे नेतृत्व केले पाहिजे हीच माझी इच्छा आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावांमध्ये युवासेना शाखा उभारून कार्यकारिणीचा फलक लावण्यात यावा व गावातील तरुणांना युवासेनेत सक्रिय सहभागी करून घ्यावे, असे आवाहन शिरूर लोकसभा मतदार संघातील युवासेनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.

दरम्यान यावेळी बाप्पू शिंदे, वैभव ढोकले, सुनील तांबे, विजय लोखंडे, नितीन नरवडे, अविनाश साकोरे, वैभव खेडकर, वैभव माशेरे, महेंद्र शेळके, तुषार माळवदे, संतोष काळे, विकास जासूद, धनंजय पठारे, सागर मुऱ्हे, सोमनाथ मुंगसे, मृगेश काळे, अविनाश येळे यांसह ५७ पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.

error: Copying content is not allowed!!!