शिरूर, पुणे | कार्यकाळ संपण्याच्या अगोदरच शिरूर भाजपचे तालुका अध्यक्ष दादा पाटील फराटे यांनी वैयक्तिक कारण देत आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर देखील फराटे यांची स्थानिक नेत्यांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी राजीनाम्यावर आपली भूमिका ठाम ठेवली त्यामुळे अखेर नवीन तालुका अध्यक्ष निवडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ऐन जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर भाजपला तालुका अध्यक्ष नव्याने निवडण्याची नामुष्की ओढवली आहे. मात्र आद्यप तालुका अध्यक्ष कोण यावर शिक्कामोर्तब झाला नाही.
माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचा विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव त्याचबरोबर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत देखील भाजपची झालेली पीछेहाट, याचा वचपा भरून काढण्यासाठी संघटनात्मक कार्यप्रणालीवर भर देणाऱ्या तालुकाध्यक्षाची गरज आता शिरूर भाजपला आहे. त्यामुळे आगामी तालुकाध्यक्ष हा केवळ बड्या कार्यक्रमात खुर्ची अडवणारा अन् कार्यकर्त्यांच्या जीवावर स्वतः ची प्रतिष्ठा वाढवणारा नको तर, संघटना वाढीसाठी प्रयत्न करणारा असावा असं मत सामान्य कार्यकर्ते खाजगीत व्यक्त करत आहेत.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला, त्यानंतर पराभव झालेले बाबुराव पाचर्णे वैद्यकीय कारणामुळे काही दिवस तालुक्याच्या राजकारणातून बाहेर राहिले. मात्र तालुक्यातील भारतीय जनता पक्षाची ताकद सातत्याने दाखवण्यासाठी आंदोलने, मोर्चे या माध्यमातून संजय पाचंगे आणि जयेश शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात रान पेटवले. अर्थात पाचंगे आणि शिंदे या जोडगोळीला अनुक्रमे उद्योग आघाडी आणि कामगार आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदाची संधी पक्षाने दिली. तालुक्यातील आंदोलने, मोर्चे यांची पार्श्वभूमी पाहता या दोघांपैकी एकाला तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळावी अशी शिरूर भाजपच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे.
दरम्यान माजी आमदार बाबुराव पाचर्णे तालुक्याच्या राजकारणात जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून सक्रिय झाले आहेत. निवडणुका, सभा, रॅली, या सगळ्याची छुपी यंत्रणा राबविणारा एक चेहरा नेहमीच पाचर्णे यांच्या गुडबूकमध्ये राहिला आहे. पक्षाच्या कुठल्याही पदावर कार्यरत नसताना स्वतःच्या गावची ग्रामपंचायत आणि विकास सोसायटीवर एकहाती सत्ता प्रस्थापित करणाऱ्या प्रदीप उर्फ आबासाहेब सोनवणे यांचे मूल्य देखील या तालुका अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेमध्ये विचारात घेतले जाऊ शकते. देवेंद्र फडणवीस, अमित शहा यांच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत शिरूर तालुक्यातील दौऱ्यात झालेली गर्दी ही सोनावणे यांची पक्षाला कौतुक वाटणारी कामगिरी मानली जाते. त्याचबरोबर शिरूर तालुक्याचा खरेदीविक्री संघ स्थापन झाल्यापासून माजी आमदार स्व. रावसाहेब पवार नंतर पुढे आमदार अशोक पवार म्हणजेच पवार कुटुंबीयांच्या सहभागाशिवाय एकही पंचवार्षिक खरेदीविक्री संघ राहिला नाही. मात्र आबासाहेब सोनवणे यांनी थेट आमदार अशोक पवार यांच्या पुतण्यासमोर आवाहन उभे करून इतिहासात पहिल्यांदा शिरूर तालुका खरेदीविक्री संघात पवार कुटुंबाला बाजूला ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीतील आबासाहेब सोनवणे यांचे मूल्य विचारात घेता आगामी भारतीय जनता पार्टीचा शिरूर तालुका अध्यक्ष म्हणून आबासाहेब सोनवणे यांच्यावर ती जबाबदारी दिली जाऊ शकते.
दरम्यान तालुका अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला नसल्याने प्रभारी तालुका अध्यक्ष निवडला जाऊ शकतो. या प्रक्रियेत राजेंद्र भुजबळ, संजय पाचंगे, राजेंद्र कोरेकर, अमित सोनवणे, जयेश शिंदे यांच्या नावाची देखील चर्चा आहे. मात्र बाबुराव पाचर्णे, प्रदीप कंद, गणेश भेगडे, धर्मेंद्र खंडारे हे वरिष्ठ नेते कोणत्या नावावर शिक्कामोर्तब करतात ते आगामी काळच ठरवेल…
Add Comment