पाबळ, पुणे | मावळत्या जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे यांचा पाबळ येथे जाहीर नागरी सत्कार आयोजित केला होता. यावेळी शिरूर – आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मानसिंग पाचूंदकर यांनी बोलायला सुरुवात करताच “मी पक्षाचा अध्यक्ष आहे त्यामुळे मला कोणताही प्रोटोकॉल लागू होत नाही मी जास्तवेळ बोलू शकतो” अशा प्रकारचे वक्तव्य करताच उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाला आहे. या पाच वर्षांत जिल्हा परिषद सदस्यांनी केलेल्या कामाचे कौतुक आणि नागरी सत्कार अनेक भागात सुरू आहे . असाच एक नागरी सत्कार केंदूर- पाबळच्या जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे यांचा पाबळच्या पिंपळवाडी ग्रामस्थांनी आयोजित केला होता. त्यात अनेक पदाधिकाऱ्यांनी बगाटे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले वक्ते बोलण्यासाठी जास्त असल्याने निवेदक निलेश पडवळ यांनी प्रत्येकाला दोन ते चार मिनिटांत आपले विचार मांडण्याची विनंती केली. मात्र मानसिंग पाचूंदकर यांनी तब्बल सोळा मिनिटे भाषण केले. अगोदरच कार्यक्रमाला उशीर झाल्याने पाचूंदकर यांनी अधिकचा वेळ घेतल्याने निवेदकाची कोंडी झाली.
दरम्यान माजी सभापती सुभाष उमाप यांनी सविता बगाटे पुन्हा जिल्हा परिषदेची निवडणूक लढणार असल्याचे आम्हाला सांगितले आहे, गेल्या पाच वर्षात अनेक विकासकामे केलेल्या बगाटे यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात जनमत आहे, त्यामुळे आम्हा इच्छुकांची कोंडी झाल्याचे मिश्किल भाषेत बगाटे यांचे कौतुक केले. यावेळी अमोल जगताप, शंकर जांभळकर, सविता पऱ्हाड, स्वाती पाचूंदकर, प्रकाश पवार, प्रदीप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे यांनी बगाटे यांचे गेल्या पाच वर्षे केलेल्या कामाचे कौतुक केले. यावेळी शेखर पाचूंदकर, विकास गायकवाड, दत्ता थिटे, अरुण साकोरे यांच्यासह केंदूर- पाबळ जिल्हा परिषद गटातील अनेक ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.
Add Comment