पुणे राजकीय संपादकीय

आढळराव पाटील आणि शिवसैनिक घनिष्ठ नातं…! मोठा निर्णय घेण्याची शक्यता..?

पुणे | शिरुर लोकसभा मतदार संघात शिवसेनेची ताकद वाढवण्याचे काम माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी इमानेइतबारे केलं असलं तरी त्यांच्यावरच पक्ष नेतृत्वाने हकालपट्टीची कारवाई केल्याने स्थानिक शिवसैनिक मात्र संभ्रमात अडकले आहेत. अर्थात ही कारवाई काही तासांत मागे घेतली असली तरी आढळराव पाटील मात्र कमालीचे नाराज झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी ज्या कारणामुळे बंड केले ते कारण राष्ट्रवादीचा असलेला जाच आणि हा जाच गेले १८ वर्षे आढळराव पाटील सोसत आहेत असं त्यांनी जाहीर पत्रकार परिषदेत देखील सांगण्याचा प्रयत्न केला.

खरं तर खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर, हवेली, हडपसर, भोसरी भागात नव्या शाखा उभ्या करून शिसैनिकांचं जाळं उभं केलेल्या आढळराव पाटलांना पक्ष कारवाईला सामोरे जावं लागले असल्याने स्थानिक शिवसैनिक अधिकच संभ्रमात सापडलाय, त्यांची निष्ठा आढळराव पाटील यांच्यावर अधिक आहे हे प्रकर्षाने जाणवते. याचं कारण म्हणजे राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या भागात काटे की टक्कर देणं एवढं सोपं नसतानाही त्यांनी शिवसैनिकांची फौज सोबत उभी करून लढाई केली.

आता मात्र आढळराव पाटील यांच्यावर आलेलं संकट हे परतवून लावण्यासाठी आढळराव पाटलांचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. एका हाकेवर शिवनेरी बंगल्यावर जमा होणारे कार्यकर्ते आणि सोबत असलेले निष्ठावंत शिवसैनिक येत्या काही दिवसांत आढळराव पाटील यांच्या होकारात होकार मिळवून वेगळा विचार करण्याचा प्रयत्न नक्कीच करतील असं काहीसं चित्र निर्माण झाले आहे. मात्र हे सगळं करत असताना कार्यकर्त्यांच्या सूचनांचा विचार करूनच आढळराव पाटील पाऊल टाकतील यात तिळमात्र शंका नाही, याचं कारण म्हणजे सातत्याने लोकांच्या गराड्यात असलेले नेते म्हणून आढळराव यांची ओळख आहे. त्यामुळे जनभावना ओळखणारे हे नेतृत्व आहे. सुरुवातीलाच महाविकास आघाडी स्थापन झाली तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादी एकत्र काम करतील मात्र शिरुर लोकसभा मतदार संघात एकत्र काम करणार नाही. अशा चर्चा सातत्याने होत्या, तसं झालं देखील. आणि ते आजपर्यंत तसच सुरु आहे. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीच्या जाचाला कंटाळलेले कार्यकर्ते थेट आढळराव पाटील यांच्या संपर्कात असतात.

आढळराव पाटील यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. गेल्या १८ वर्षांपासून राष्ट्रवादीशी लढाई केली, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या भागात शिवसेना वाढवली. आज सुद्धा शिवसैनिकांवर झालेल्या अन्यायावर मी सातत्याने लढतोय, शरद पवारांनी मोठी ऑफर देऊनही मी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी प्रामाणिक राहिलो, मी एकनिष्ठ राहिलो, राष्ट्रवादीला सातत्याने अंगावर घेतलं याचीच आज फळे भोगतोय का.? पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असूनही अचानक हकालपट्टीची कारवाई त्यानंतर पुन्हा सारवासारव करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून करण्यात आला. परंतु आढळराव पाटील पक्षावर प्रचंड नाराज झालेले पहायला मिळाले. त्यामुळे आगामी काळात शिरुर लोकसभा मतदार संघात देखील मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या तर नवल वाटायला नको.

Add Comment

Click here to post a comment

error: Copying content is not allowed!!!