मुंबई | शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील राजकारणात मोठा बदल झाला. त्यानंतर शिरूर लोकसभा मतदार संघातील खेड, शिरुर, हवेली, आंबेगावमधील पदाधिकारी आणि शिवसैनिकांना घेऊन जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आणि शिवसेना नेत्या जयश्री पलांडे यांनी थेट उद्धव ठाकरे यांचे मातोश्री हे निवस्थान गाठले. दोनशे शिवसैनिक घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पक्षबांधणी संदर्भात चर्चा केली. यावेळी जयश्री पलांडे यांनी लोकप्रतिनिधींकडे पक्ष संघटनेतील पदाधिकारी निवडीची जबाबदारी देऊ नये, जेणेकरून स्थानिक विकासकामांना लोकप्रतिनिधी प्राधान्य देतील, याशिवाय शिवसैनिकांना पक्ष संघटनेत काम करता आलं तर पक्षाचे हात मजबूत होतील. या मुद्द्याकडे उद्धव ठाकरे यांचे पलांडेंनी लक्ष वेधले. असल्याचे जातेगाव खुर्दचे माजी सरपंच समाधान डोके यांनी सांगितले
दरम्यान माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचे वृत्त सकाळी लवकर आले होते, त्यापाठोपाठ आढळराव पाटील शिवसेनेतच असल्याच्या बातम्या देखील तात्काळ प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे जयश्री पलांडेंनी आढळराव पाटील यांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांसह मातोश्री गाठली अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र ‘The बातमी’शी बोलताना पलांडे यांनी सांगितले की, राज्यात झालेल्या राजकीय घडामोडी आणि पक्षावर झालेल्या आघातामुळे सामान्य शिवसैनिक म्हणून आमच्या नेतृत्वाची भेट घेणे ही आमची जबाबदारी होती. ती पूर्ण करण्यासाठी आम्ही सकाळी मुंबईच्या दिशेने जात असताना आम्हाला रस्त्यात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे वृत्त समजले आणि मातोश्रीवर पोहोचण्याच्या आधीच दादा शिवसेनेतच असल्याचे वृत्त समजले त्यामुळे यासंदर्भात आम्हाला काहीही कल्पना नव्हती.
११ जुलैला न्यायालयाचा निकाल आल्यानंतर पुढील वाटचाल लवकरच स्पष्ट करू, लोकप्रतिनिधी आणि संघटना यांच्यात योग्य मेळ घालण्यासाठी संघटनेची जबाबदारी लोकप्रतिनिधींच्या मर्जीने न होता ती स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या शिवसैनिकांकडे असावी यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. त्याला पक्षप्रमुखांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे जयश्री पलांडे यांनी सांगितले. यावेळी शिरुर- आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख विजय पाटील, अनिल काशिद, महिला आघाडीच्या श्रध्दा कदम, रविंद्र गायकवाड, गणेश जामदार, नितीन दरेकर, कांतराम नप्ते, किरण देशमुख यांसह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक मातोश्रीवर उपस्थित होते.
Add Comment