शिरुर, पुणे | रावसाहेबदादा घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले, त्यानंतर दाखल केलेल्या अर्जाची छाननी प्रक्रिया शुक्रवारी (दि. १ जुलै) रोजी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यावेळी दोन अर्ज सह्यांच्या अभावामुळे बाद करण्यात आले आहेत. त्याचबरोबर पाच अर्जांवर हरकती घेतल्या असल्याने निवडणूक अधिकारी दिग्विजय आहेर यांनी दोन्ही बाजूचे अर्थात हरकत घेणाऱ्याचे आणि अर्जदार यांचे म्हणणे ऐकून घेत निकाल राखून ठेवला आहे. सोमवारी (दि. ३) रोजी सकाळी ११ वाजता याचा निकाल दिला जाणार आहे.
दरम्यान विरोधी गटाच्या दोन आणि सत्ताधारी गटाच्या तीन उमेदवारी अर्जांवर हरकती नोंदविल्या आहेत. त्यापैकी विरोधी गटाचे अर्जदार दादा पाटील फराटे यांनी सहकारी बँकेचे देणे थकविल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात यावा म्हणून संभाजी फराटे इनामदार यांनी हरकत नोंदविली आहे, तर दादा पाटील फराटे यांनी त्यांच्या बाचावामध्ये “मी ज्या बँकेचे देणं तात्पुरते थकविले होते त्या बँकेचा आणि कारखाना निवडणूकीचा कुठलाही संबंध नाही, याशिवाय यापूर्वी मी पुणे जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक लढलो आहे. त्यामुळे विरोधकांच्या हरकतीचा मुद्दा केवळ सूडाच्या भावनेतून केलेला आहे”. असे मत दादा पाटील फराटे यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर विरोधी गटाचे दुसरे उमेदवार काकासाहेब खळदकर यांच्या उमेदवारी अर्जांवर उमेश साठे यांनी हरकत घेत कारखान्याला तीन वर्षे ऊस घातला नसल्याचे कारण दिले आहे. तर खळदकर यांनी बचावासाठी कोरोनाच्या महामारीचे कारण देत ऊस उत्पादनात बदल झाल्यामुळे एका वर्षात ऊस घालू शकलो नसल्याचे कारण दिले आहे.
सत्ताधारी गटाचे प्रमुख आणि शिरुर- हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्यासह पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुजाता पवार आणि मुलगा ऋषिराज पवार या तिघांच्याही उमेदवारी अर्जांवर ठकसेन ढवळे, विरेंद्र शेलार, शिवाजी शेलार, काकासाहेब खळदकर यांनी हरकती नोंदविल्या आहेत. त्यामध्ये रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात दुसरा व्यंकटेश कृपा या खाजगी साखर कारखान्यासाठी स्वतःची जमीन तारण देऊन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून १०० कोटींचे कर्ज घेतले आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आणि अर्जदारांचे खाजगी साखर करखान्याशी आर्थिक हितसंबंध असल्याने सहकारी साखर कारखान्याला ते बाधा आणणारे आहेत, त्यामुळे तिघांचेही उमेदवारी अर्ज बाद व्हावे अशी हरकत विरोधी गटाने नोंदविली आहे. त्यामुळे घोडगंगा कारखान्याचे सत्ताकेंद्र असलेल्या पवार कुटुंबियांच्या अर्जावरच टांगती तलवार असल्याने ही निवडणूक अधिकच रंजक झालेली पाहायला मिळत आहे.
दरम्यान सातत्याने खाजगी व्यंकटेश कृपा साखर कारखान्यावरून विरोधकांनी आमदार अशोक पवार यांना धारेवर धरले आहे. त्यातच आता १०० कोटींचे कर्ज कारखान्याला मिळवून देण्यासाठी कुटुंबातील सदस्यांची जमीन तारण असल्याने खाजगी करखान्याशी जोपासलेले आर्थिक हितसंबंध हे उघड झाले आहेत. त्यामुळे सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत मोठ्या घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी गटाला सत्तेपासून दूर करण्यासाठी विरोधी गटाने चांगलेच दंड थोपटले असल्याचे दिसून येत आहे.
Add Comment