शिक्रापूर, पुणे | शिरुर तालुक्यातील माणसं ही स्वाभिमानी आहेत. जर ठरवलं असतं तर तुमच्यासारखे पैशावाले हजार जण जरी निवडणूकित उभे राहिले असते ना, तरी हजार जणांना रसिकभाऊ धारिवाल यांनी पाडलं असतं, परंतु हा शिरुर तालुका स्वाभिमानी आहे, त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील सदस्याला प्रचंड मतांनी निवडून दिलं. त्यामुळे पैसे देणाऱ्यांना मतदान करू नका, शेतकऱ्यांचं भलं करणाऱ्यांना मतदान करा. असं विधान शिक्रापूर (ता. शिरुर) येथील दिवंगत नेते बाळासाहेब खैरे यांच्या आईच्या दशक्रिया विधीच्या भाषणात केले आहे.
गरिबांच राजकारण झालं पाहिजे, शेतकऱ्यांच्या हिताचं राजकारण झालं पाहिजे, पैसे न घेता राजकारण झालं पाहिजे ही आपली संस्कृती आहे. विधानसभा निवडणुकीत प्रचंड पैसे असलेले दिवंगत रसिकभाऊ धारिवाल एवढे मोठे नेते माझ्या समोर उभे होते. कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय होता, परदेशात देखील त्यांचा व्यवसाय होता. तरी सुद्धा या तालुक्यातील गोरगरीब जनतेने एका रुपयालाही स्पर्ष न करतान, एक पै न घेता, पदरचे पैसे देऊन, पदरच्या भाकरी खाऊन मला निवडून दिलं. हे मी कधीच विसरणार नाही. हीच आपल्या तालुक्याची संस्कृती आहे हे आपण जपलं पाहिजे. असं मत पलांडे यांनी व्यक्त केले.
पुढे ते म्हणाले पैसे देऊन जर तुम्ही निवडणूक लढवणार असाल ना तर गरीब माणसं ही खूप स्वाभिमानी आहेत, यशवंतराव चव्हाणांनी या तालुक्याचा गोडवा गायला आहे. तरुण मित्रांना माझं आवाहन आहे. पैसे तुमच्याकडे आले तुम्ही उद्योगपती झाले. जमिनीचे बाजारभाव कोटींवर गेले हे कोटी तुम्ही जतन करा, याच्या जीवावर तुम्ही निवडणूक लढविणार असणार तर हे योग्य नाही. समाज बिघडलेला नाही हा समाज तुम्ही बिघडवत आहात. तुम्ही चार जण निवडणुकीला उभे राहता आणि मतदारांना पैसे देता. याने पैसे दिले की, तो पैसे देतो याचं आत्मचिंतन करा. असे आवाहन करत समोर बसलेल्या तरुण राजकारण्यांना सल्ला दिला. यावेळी अशा प्रकारचा दशक्रिया विधीमध्ये सामाजिक संदेश देणाऱ्या माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांचे उपस्थितांनी टाळ्या वाजवून कौतुक केले.
दरम्यान आगामी निवडणुकीच्या राजकारणाबाबत देखील माजी आमदार सूर्यकांत काका पलांडे यांनी चिंता व्यक्त केली. आणि मतदारांना देखील आवाहन केले की कोणत्याही निवडणुकीत पैसे देणाऱ्या उमेदवारांना पराभूत करा आणि पैसे न देणाऱ्या उमेदवाराला निवडून द्या. दरम्यान घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे येत्या काही दिवसांत ही निवडणूक पार पडेल. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी सभासद पुरस्कृत ‘घोडगंगा किसान क्रांती’ या पॅनेलच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात काही विरोधकांनी एकत्र येत निवडणूक लढविण्याचा मानस केला आहे. आणि त्यात देखील पॅनेलच्या प्रमुखांनी घोषणा केली आहे की, निवडणुकीत आम्ही मताला तीन हजार रुपये भाव देणार नाही परंतु कारखान्यावर काम करण्यासाठी एकहाती सत्ता दिली तर, ऊसाला प्रतिटन तीन हजार रुपये भाव नक्कीच देऊ. त्यामुळे माजी आमदार सूर्यकांत काका पलांडे यांच्या या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर पलांडे यांनी व्यक्त केलेल्या भावनांना शेतकरी मतदार किती प्रतिसाद देतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
भावी उमेदवारांना जबरी चपराक..!
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती त्याचबरोबर कारखान्याची निवडणूक या सगळ्या निवडणुका येत्या काही महिन्यांत होतील. त्या पार्श्वभूमीवर शिरुर तालुक्यात इच्छुक उमेदवार आरक्षण जाहीर होण्याच्या अगोदर आणि निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याच्या अगोदरच विविध पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी प्रचंड पैशांचा वारेमाप वापर करत आहेत. अशा तालुक्याची संस्कृती बिघडविणाऱ्या आणि गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या भावी उमेदवारांना माजी आमदार सूर्यकांत काका पलांडे यांनी जबरी चपराक लगावली आहे.
Add Comment