माजी मंत्री बाप्पूसाहेब थिटे, उद्योगपती रसिकलाल धारिवाल माजी चेअरमन आनंदराम आचार्य यांची देखील मयत म्हणून नोंद नाही…!
शिरूर, पुणे | रावसाहेबदादा घोडगंगा सहकारी साखर कारखाना प्रशासनाच्या बेकायदेशीर कारभारावर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नव्याने गठीत झालेल्या ‘घोडगंगा किसान क्रांती’ पॅनेलने बोट ठेवत प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकती नोंदविल्या आहेत. अनेक मयत सभासदांचे नाव मतदार यादीत अद्याप तसेच आहे. मयत सभासदांच्या वारसांना सभासदत्वचा अधिकार मिळावा यासाठी (२३ मे रोजी) जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीवर वारसदारांनी हरकत नोंदविण्याचे आवाहन घोडगंगा किसान क्रांतीच्या नेत्यांनी केले होते. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून तब्बल दोन हजारहून अधिक हरकती नोंदविण्यात आल्या असल्याची माहिती घोडगंगा किसान क्रांतीचे सुरेश पलांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान (२३ मे रोजी) प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकती घेण्यासाठी ३१ मे पर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीत मोठ्या प्रमाणात हरकतींची नोंद झाली. यासंदर्भात प्रादेशिक सहसंचालक साखर यांनी घोडगंगा सहकारी साखर कारखाना कार्यकारी मंडळास ज्यांनी ज्यांनी हरकती नोंदविल्या आहेत, अशा सर्वांना नोटिसा देऊन त्यांची पोहोच सुनावणीच्या दिवशी म्हणजेच सोमवारी ६ जून रोजी कार्यालयास सादर करण्याची सूचना घोडगंगा कारखाना प्रशासनाला दिली होती. मात्र घोडगंगा प्रशासनाने प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचा आरोप घोडगंगा कारखान्याचे संचालक सुधीर फराटे यांनी केला आहे. त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी हरकती नोंदविल्या आहेत अशा सर्वांनी सुनावणीसाठी ६ जून रोजी साखर संकुल शिवाजीनगर पुणे येथील कार्यलयात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान घोडगंगाचे माजी चेअरमन स्व. आनंदराम आचार्य (महाराज), माजी मंत्री, माजी खासदार स्व. बापुसाहेब थिटे, प्रसिद्ध उद्योगपती स्व. रसिकलाल धारिवाल यांच्या वारसांना देखील वारस नोंद करून सभासद केलेले नाही. शिवाय हे तीनही दिग्गज मयत सभासद कारखान्याच्या जडणघडणीमध्ये अग्रभागी होते. यांची देखील यादीत मयत म्हणून नोंद नाही. यासह अनेक आजी माजी संचालक तसेच संस्थापक सभासदांच्या वारसांना सभासद करून घेतलेले नाही. ही सर्वात मोठी दुर्दैवाची गोष्ट असल्याचे मत घोडगंगा किसान क्रांतीचे नेते दादा पाटील फराटे यांनी व्यक्त केले.
जाणीवपूर्वक मयत सभासदांच्या वारसांना त्यांचा हक्क दिला जात नाही, कारखान्याला ऊस घातलेल्या अनेक शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पैसे मिळाले नाही, खाजगी कारखाना दोन हजार सातशे रुपयांचा बाजारभाव देतो. मात्र शेतकऱ्यांच्या हक्काचा घोडगंगा कारखाना असूनही सत्ताधारी मंडळी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम करत आहे. त्यामुळे शेतकरी सभासदांवर अन्याय करणाऱ्या सत्ताधारी नेत्यांना खुर्चीवरून खाली खेचण्याची वेळ आली असल्याचे मत भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी व्यक्त केले.
Add Comment