राष्ट्रवादीच्या स्नेह मेळाव्याला माजी आमदार गावडे, मानसिंग पाचूंदकर उपस्थित प्रकाश पवार अनुपस्थित..!
न्हावरे, शिरुर| रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. येत्या ३१ जुलै रोजी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या नव्या संचालक मंडळाची निवडणूक होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे विरोधकांसह सत्ताधारी देखील ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेले पाहायला मिळत आहे.
जवळपास एक महिना अगोदरच विरोधी गटाने निवडणुकीच्या हालचाली सुरू केल्या आहे. मांडवगण फराटा (ता. शिरुर) येथे एक बैठक घेऊन विरोधी गटाने निवडणूक लढविण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसारच तालुक्याच्या विविध भागात जाऊन विरोधी गटातील दादा पाटील फराटे, सुधीर फराटे, सुरेश पलांडे, काकासाहेब खळदकर यांच्यासह अनेकांनी बैठकींचे सत्र सुरू केले आहे. त्यातच आता सत्ताधारी गटाकडून देखील आगामी कारखान्याच्या निवडणुकीबाबत कारखान्याजवळ असलेल्या आंधळगाव फाटा येथे स्नेहमेळावा घेण्यात आला यावेळी स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध नेत्यांनी हजेरी लावली.
रविंद्र काळे आणि मानसिंग पाचूंदकर यांच्या माध्यमातून कारखान्याच्या निवडणुकीबाबत बैठक बोलाविली होती यावेळी कारखान्याचे संचालक मंडळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिरुर आंबेगाव विधानसभा मतदार संघातील ३९ गावांमधील प्रमुख नेत्यांपैकी माजी आमदार पोपटराव गावडे, मानसिंग पाचूंदकर हे उपस्थित होते मात्र या स्नेह मेळाव्यात कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन प्रकाश पवार यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. दरम्यान बैठकीत विरोधकांवर रवींद्र काळे यांनी निशाणा साधला, तर मानसिंग पाचूंदकर यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीची आठवण करून देत पुन्हा एकहाती सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.
माजी आमदार पोपटराव गावडे यांनी कारखाना स्थापनेच्या आणि सत्तासंघर्ष झालेल्या आठवणी ताज्या केल्या. तर आमदार अशोक पवार यांनी विरोधकांवर टीका करत भाजप राज्य सरकारच्या काळात सरकारने घेतलेल्या धोरणांमुळे कारखान्याचा कसा तोटा झाला याचा पाढा वाचला. त्यामुळे आता कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्याने सत्ताधारी आणि विरोधक ऍक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. विरोधी गटाने देखील आपली पुढील रणनीती आखली आहे, त्यामुळे आगामी होणारी रावसाहेबदादा घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक शिरुर तालुक्याच्या राजकारणात रंगत आणणार असल्याचे बोलले जात आहे.
Add Comment