मुंबई | घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटात न्यायालयीन लढाई सुरू आहे. कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन दादा पाटील फराटे यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी आमदार अशोक पवार यांच्याकडून अटीतटीचे प्रयत्न झाले. उच्च न्यायालयात आमदार पवार यांच्या गटाने धाव घेतली मात्र पवार गटाची याचिका फेटाळून न्यायालयाने दादा पाटील फराटे यांचा उमेदवारी अर्ज कायम केला आहे. त्यामुळे पवार यांच्या गटाला मोठा धक्का आणि दादा पाटील फराटे यांना दिलासा मिळाला असल्याचे अँड. सुरेश पलांडे यांनी सांगितले.
घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, आमदार अशोक पवार यांच्या गटाने दादा पाटील फराटे यांनी एका सहकारी संस्थेचे कर्ज थकविल्याने फराटे यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी हरकत घेतली. सुरुवातीला शिरुर येथे निवडणूक अधिकाऱ्यांनी फराटे यांचा उमेदवार अर्ज मंजूर केला, मात्र पवार गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली. यावेळी उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या मुद्यावर आक्षेप घेता येणार नाही. त्यामुळे आमदार पवार यांच्या गटाला एकप्रकारे हा धक्का मानला जात आहे. दादा पाटील फराटे यांच्या बाजूने अँड. विजय पाटील आणि अँड. सुरेश पलांडे यांनी काम पाहिले तर आमदार पवार यांच्या गटाच्या बाजूने जेष्ठ विधीतज्ञ अँड. वाय. एस. जहागीरदार आणि कारखान्याच्या बाजूने जेष्ठ विधीतज्ञ अँड. विनीत नाईक यांनी काम पाहिले.
यावेळी आमदार अशोक पवार गटाच्या बाजूने दादा पाटील फराटे यांना निवडणूक लढवता येऊ नये म्हणून सर्व पर्याय अवलंबले मात्र त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे दादा पाटील फराटे यांना या निर्णयामुळे एकप्रकारे दिलासाच मिळाला तर पवार यांना धक्का बसला असल्याचे अँड. सुरेश पलांडे यांनी सांगितले.
Add Comment