मंचर, पुणे | शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला त्यासंदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत मूळ शिवसेनेतच राहिलेल्या शिवसैनिकांनी बैठक घेतली यावेळी माजी खासदार आढळराव पाटील यांच्यावर सडकून टीका केली.
नुकताच शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मी शिंदे गटात का सामील झालो, याची कारणे देत शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांवर नाराजी व्यक्त केली. खेड पंचायत समिती प्रकरण, नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या म्हणून हकालपट्टी, राष्ट्रवादीशी जुळवून घेऊन त्यांचा प्रचार करायचा, आमच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी आमच्या स्थानिक आमदारांना गृहमंत्री केलं, तालुक्यातील अधिकाऱ्यांना भेटू दिलं जात नव्हतं, रात्री अपरात्री अधिकारी भेटायला यायचे, तहसीलदार कार्यालय, पोलीस स्टेशन, निधी, या सगळ्या गोष्टींसाठी संघर्ष, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आता तरी आधार मिळेल अस वाटलं, राष्ट्रवादीच्या विरोधात ताकद मिळेल असं वाटलं, मात्र दुर्दैवाने असं झालं नाही याउलट गावोगावी शिवसैनिकांना त्रास सुरू झाला, ज्या मतदार संघात मी लढलो तो मतदार संघ सोडून पुण्यातून लढायला सांगितले. या सगळ्या गोष्टीमुळे मी नाराज झालो आणि शिंदे गटात सामील झालो. अशा प्रकारची खदखद आढळराव पाटील यांनी व्यक्त केली.
मात्र इकडे अविनाश रहाणे, राम गावडे, सुरेश भोर, राजाराम बाणखेले, अशोक खांडेभराड, राहुल गोरे, विजया शिंदे, गणेश सांडभोर, शरद चौधरी, पोपट शेलार, किरण देशमुख, गणेश जामदार, समाधान डोके, बाप्पू मासळकर, वैभव खेडकर या पदाधिकाऱ्यांसह अनेक शिवसैनिकांनी मंचर येथील गोरक्षनाथ टेकडी या ठिकाणी बैठक घेतली. त्याचबरोबर खेड येथील चौकात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत निषेध व्यक्त केला. दरम्यान गोरक्षनाथ टेकडी या ठिकाणी झालेल्या बैठकीत अनेक शिवसैनिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. यामध्ये ‘ही ब्याद बरी गेली, साडेसाती गेली’, आढळराव पाटील शिंदे गटात गेल्यामुळे मतदार संघात शिवसेनेवर काही परिणाम होईल का ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राम गावडे यांनी उत्तर देताना ‘मतदार संघावर नाही पण यांच्या डोक्यावर परिणाम होईल’ अशा तीव्र भावना व्यक्त केल्या.
यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी आढळराव पाटील यांचा खरमरीत समाचार घेतला, केवळ स्वतःच्या खासदारकीसाठी आढळरावांनी शिवसैनिकांचा वापर केला, शिवसैनिकांना मोठं होऊ दिलं नाही, शिवसैनिकांना कोणतीही ताकद दिली नाही, याउलट स्थानिक आमदार दिलीप वळसे पाटील यांच्याशी कायम छुपी युती केली. अशा प्रकारच्या अनेक टीकांचे बाण शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर शिवसैनिकांनी सोडले. ज्या नेत्यांना आढळराव पाटील यांच्यासोबत जायचे त्यांनी आत्ताच जावे, दरम्यान अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी सावध भूमिका घेत दोनीही बैठकीला अनुपस्थिती दाखवली. त्यामुळे आगामी काळात आढळराव पाटील यांच्या निर्णयात कोण कोण सहभागी होणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे.
Add Comment