Uncategorized राजकीय शिरूर

मा. आमदार गावडे गहिवरले, ग्रामपंचायत निवडणुकीत घरोघरी प्रचार करत मतदारांना भावनिक आवाहन…!

शिरुर, पुणे | टाकळी हाजी (ता. शिरुर) ग्रामपंचायतची निवडणूक ही शिरुर तालुक्यातील अत्यंत महत्वाची आणि अतिशय अटीतटीच्या निवडणुकीपैकी एक असल्याने संपूर्ण तालुक्याचेच नव्हे तर शेजारील दोन तालुक्यांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. माजी आमदार पोपटराव गावडे आणि माजी सरपंच दामू घोडे यांनी एकमेकांना आवाहन देत पॅनेल उभे केले आहे. यामध्ये माजी आमदार गावडे यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत घरोघरी जाऊन मतदारांना भावनिक साद घातली आहे. तर माजी सरपंच दामू घोडे हे देखील पूर्वीपासून असलेल्या दांडग्या जनसंपर्काचा आधार घेत मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न करत आहेत.

अत्यंत अटीतटीची लढाई या टाकळी हाजी ग्रामपंचायत निवडणुकीत पाहायला मिळत आहे. माजी आमदार विरुद्ध माजी सरपंच असा सामना पाहायला मिळत आहे. दोन्ही गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अर्थात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक पातळीवर कार्यरत आहेत. परंतु यापूर्वीच्या निवडणुका एकत्रित लढलेले दोन्ही कुटुंबांनी ग्रामपंचायत निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. गेल्या २०१७ ची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक एकत्र म्हणजेच जिल्हा परिषद सदस्या पदासाठी माजी आमदार गावडे यांच्या सुनबाई सुनीता गावडे तर पंचायत समिती सदस्या पदासाठी माजी सरपंच दामू घोडे यांच्या पत्नी अरूणा घोडे यांनी एकत्रित निवडणूक लढवून विजय मिळवला. त्याचबरोबर यापूर्वीची ग्रामपंचायत निवडणूक देखील एकाच पॅनेलमधून लढविली, मात्र गेल्या पाच वर्षांत या दोन्ही कुटुंबात कमालीचे मतभेद झाले आणि त्याचे परिणाम या ग्रामपंचायत निवडणुकीत पाहायला मिळत आहे.

गुरुवारी (दि. ४) रोजी ग्रामपंचायत निवडणूक पार पडणार आहे. सद्या प्रचाराच्या तोफा थंडवल्या आहेत. मंगळवारी (दि. २) रोजी माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या पॅनेलची सांगता सभा पार पडली. या सभेत गावडे यांनी मतदारांना भावनिक आवाहन केले. ही माझी ग्रामपंचायतसाठी मत मागण्याची शेवटची वेळ आहे. मी ज्या मुलाच्या कर्तृत्वाने राजकारण आणि समाजकारणात सक्रिय राहिलो तो मुलगा मला सोडून गेला, मला असं घरोघरी मत मागण्याची वेळ माझ्या मुलाने कधी येऊ दिली नाही. आज जो माणूस माझ्या विरोधात उभा आहे त्या माणसाला राजकारणात मोठं करण्याचं काम माझ्या मुलाने केलं. माझा मुलगा असता तर आज ही वेळ आली नसती, माझ्या मुलाने ज्याला घडवलं तोच माझ्या समोर आवाहन देऊन उभा आहे. माझ्या मनाला खूप वेदना झाल्या आहेत, नाविलाजने मला तुमच्या समोर यावं लागलं आहे. हे सगळं बोलत असताना माजी आमदार पोपटराव गावडे यांना गहिवरून आलं होतं. यावेळी उपस्थित मतदारांना भावनिक साद घालत ग्रामपंचायतच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन गावडे यांनी केलं.

दरम्यान दामू घोडे यांच्या पत्नी पंचायत समितीच्या सदस्या आहेत. इकडे सविता पऱ्हाड यांना पंचायत समितीच्या उपसभापती पदी काम करण्याची संधी मिळाली मात्र घोडे यांना ती मिळाली नाही त्याचबरोबर कोरोना काळातील राजकारण यासारख्या अनेक कारणांमुळे गावडे आणि घोडे कुटुंबात मतभेद झाल्याचे स्थानिक ग्रामस्थ सांगतात. परंतु या दोन्ही कुटुंबाचे जिल्हा परिषद, पंचायत समिती मध्ये वर्चस्व आहे मात्र ग्रामपंचायत पातळीवर हे राजकारण पोहचले असल्याने परिसरातील नागरिक खंत व्यक्त करत आहेत.

error: Copying content is not allowed!!!