आंबेगाव / शिरूर : राष्ट्रवादी ( शरदचंद्र पवार ) काँग्रेस पक्षाचे संभाव्य उमेदवार देवदत्त निकम यांना एबी फॉर्म दिल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे. शरद पवार यांनी यादी जाहीर करण्यापूर्वीच उमेदवारी निश्चित असलेल्या उमेदवाराला एबी फॅार्मचे वाटप केल्याने आंबेगाव शिरूर येथील कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
आज एबी फॉर्म वाटपावरून दोनही राष्ट्रवादी पवारांच्या नेत्यांभोवती चर्चा रंगली आहे. एकीकडे राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेस पक्षाचे नेते आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना अजित पवारांनी एबी फॉर्म दिला आहे. तर दुसरीकडे शरद पवारांनी कार्याध्यक्ष व भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक देवदत्त निकमांना थेट एबी फॉर्मच मतदारसंघात पाठवून दिल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. यामुळे आंबेगाव शिरूर विधानसभा निवडणुक वळसे पाटील विरुद्ध निकम अशी लढत निश्चीत झाली आहे.
अजित पवारांनी आज एकूण १७ जणांना एबी फॉर्मचे वाटप केले आहे. यात शिरूर लोकसभा मतदार संघातील जुन्नर येथील विद्यमान आमदार अतुल बेनके, हडपसरचे आमदार चेतन तुपे आणि आंबेगाव येथून वळसे पाटील यांना फॉर्म दिले आहे. अद्याप शिरूर आणि खेडचे जागावाटप गुलदस्त्यात ठेवले आहे. विद्यमान आमदारांना फॉर्म मिळाल्याने उमेदवार आनंद व्यक्त करत असून प्रचाराच्या तोफा त्यांनी डागल्या आहेत. येत्या २४ तारखेला वळसे पाटील सभा झाल्यानंतर निवडणुकीचा अर्ज दाखल करणार आहे.
राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका होणार असून २२ ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी होणार आहे. त्यानंतर नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर असणार आहे. २० नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना आता वेग आल्याचे दिसून येत आहे.
Add Comment