ताज्या घडामोडी राजकीय शिरूर हवेली

महायुतीच्या गोंधळात पुन्हा पवारचं…?

शिरूर : उमेदवारी मलाच हवी या गोंधळात ‘ना तुला ना मला जे काही मिळालं ते तिसऱ्यालाच’ ! या उक्ती प्रमाणे विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रभर चित्र पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यात चर्चित असलेला शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ महायुतीने राष्ट्रवादी ( अजित पवार ) काँग्रेस पक्षाला ही जागा सोडली आहे. ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांना उमेदवारी मिळाल्याने भारतीय जनता पक्षाचे प्रदीप कंद नाराज झाले आहे.

पुणे जिल्ह्यातील भाजप नेते प्रदीप कंद यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, ‘शिरुर विधानसभा मतदारसंघ हा भाजपाचा पारंपरिक मतदारसंघ असुन २००४ ते २००९ व २०१४ ते २०१९ या कालावधीत महाराष्ट्र विधानसभेत शिरूर विधानसभा मतदारसंघातुन भाजपाचे माजी आमदार स्वर्गीय बाबुराव पाचर्णे यांनी प्रतिनिधित्व केलेले आहे . साधारण १ ते १.२५ लाख हक्काचे मतदार भाजपाचे या मतदारसंघात असताना हा मतदारसंघ राष्ट्रवादीस जाणे हे अनपेक्षित आहे. राष्ट्रवादीस या मतदारसंघात उमेदवार नसताना त्यांनी इतर पक्षातील उमेदवारास राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी घोषित केल्याने मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले आहेत’.विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते व भाजपा पदाधिकारी कंद यांनी अपक्ष निवडणूक लढवण्यासाठी आग्रह धरत असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र कंद यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार अशी भूमिका स्पष्ट केली आहे.

काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी एक बैठक घेत विधानसभा निवडणुकीसाठी कोणताही उमेदवार आयात करु नये. त्यापेक्षा आमच्यातील कोणालाही उमेदवारी द्यावी असे पत्र अजित पवार यांना दिले होते. परंतु कटके यांचा पक्ष प्रवेश झाल्यानंतर त्यांना महायुतीकडुन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी नाट्य सुरू आहे. उमेदवारी मलाच हवी या गोंधळात ‘ना तुला ना मला जे काही मिळालं ते तिसऱ्यालाच’ ! या उक्ती प्रमाणे शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील महायुतीत झाले आहे.

महायुती राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात उमेदवारीसाठी चाललेली चढाओढ लक्षात घेता अजित पवारांनी उध्दव ठाकरे यांच्या पक्षात सुरुंग लावून कटके यांचा पक्षप्रवेश करून घेतला आहे. तसेच आयात उमेदवाराला उमेदवारी जाहीर केली. परंतु अजित पवारांना आयात केलेल्या उमेदवाराचा लोकसभेला चांगला फटका बसला आहे. शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) यांची ऐनवेळी साथ सोडली आणि राष्ट्रवादी ( अजित पवार ) काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शरद पवारांच्या विचारांचा प्रभाव, एकनिष्ठता आणि पक्षांतर या समीकरणांचे निरीक्षण करून मतदारांनी खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना कौल दिला. याचीच पुनरावृत्ती विधानसभेला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिरूर हवेलीचे दोन वेळा असलेले शरद पवार यांचे एकनिष्ठ आमदार अशोक पवार यांचे तगडे आव्हान आणि नुकताच पक्ष प्रवेश केलेले माऊली कटके यांना पेलवणार का ? याचा निर्णय २३ नोव्हेंबर रोजी लागणार आहे.

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!