ताज्या घडामोडी राजकीय शिरूर हवेली

पवारांना चॅलेंज महायुतीत बंड, नक्की चाललंय तरी काय…?

शिरूर : विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २९ ऑक्टोंबर शेवटचा दिवस आहे. पुणे जिल्ह्यात महायुतीचा उमेदवार म्हणून शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. कटके यांचा आज उपमुख्यमंत्री अजित पवार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिरूर येथे उपस्थित राहणार आहे. भाजपचे नेते प्रदीप कंद देखील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये राष्ट्रवादी ( अजित पवार ) काँग्रेस पक्षाला जागा सोडण्यात आली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य आणि एकेकाळी शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाची जिल्ह्याची धुरा सांभाळत असलेले ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांचा अजित पवारांनी राष्ट्रवादी प्रवेश करून घेतला आणि उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली. याच दरम्यान राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी नाराजी व्यक्त केली. त्याच वेळी राष्ट्रवादीचे बंडखोर नेते शांताराम कटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाला ही जागा मिळाली नसल्याने भाजप नेते व पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद यांनी नाराज कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर निर्धार मेळावा घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे महायुतीचा डोलारा राज्यात जरी मजबूत दिसत असला तरी देखील स्थानिक पातळीवर मात्र पोकळ झालेला पाहायला मिळत आहे.

महायुतीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार नसताना त्यांनी शिवसेनेला सुरुंग लावत उमेदवार आयात केला आहे. याच आयात उमेदवारांमुळे स्थानिक पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र आज युतीतील कटके आणि कंद उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. उमेदवारी अर्ज कायम ठेऊन कंद खरंच बंडखोरी करणार की, भाजप भविष्यातील एखाद आश्वासन देऊन ज्वलंत झालेले बंड थंड करणार हे येत्या ०४ तारखेपर्यंत कळेल.

शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असे सध्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार) पक्षाचे पुणे जिल्ह्यातील एकमेव आमदार अशोक पवार यांना ‘ पवार साहेबांनी मंत्री करायचं ठरवलं आहे, पण तू आमदार कसा होतो ते मी बघतो ‘ असे अजित पवारांनी आव्हान दिले आहे. परंतु अजित पवारांनी आयात उमेदवार केलेला जनतेच्या पचनी खरंच पडेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशोक पवारांना थेट आव्हान दिल्याने ही लढाई आता अशोक पवारांना दिलेल्या आव्हानाची नाही, तर शरद पवारांनी दिलेल्या मंत्री पदाच्या आश्वासनाला चॅलेंज केले आहे.

error: Copying content is not allowed!!!