शिरूर : स्वारगेट बसस्थानक येथील बलात्कार प्रकरण ताजे असताना पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात दरोड्यासह सामूहिक बलात्काराची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पुणे शहरातील स्वारगेट येथे काही दिवसांपूर्वी बलात्काराची घटना घडलेली असताना जिल्ह्यात आता सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. स्वारगेट बसस्थानक प्रकरणातील आरोपी हा शिरूर तालुक्यातील आहे. त्याच तालुक्यातील कारेगाव ( ता.शिरूर ) येथे दि. ०१.०३.२०२५ रोजी बाभूळसर रस्त्यालगत रात्रीच्या सुमारास १९ वर्षीय पीडित युवती आणि मामेभाऊ गप्पा मारत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चाकुचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देवुन हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जबरदस्तीने युवतीला मामेभावासोबत शरीर संबध करण्यास भाग पाडले आहे. हा सर्व प्रकार मोबाईल फोनमध्ये व्हिडिओ चित्रित करून या दोन नराधमांनी पीडित युवतीवर आळीपाळीने बलात्कार केला आहे. ही संपूर्ण घटना घडल्यानंतर आरोपींनी पीडित युवतीच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पीडित युवती आणि मामेभाऊ घरी आल्यानंतर बहिणीस घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पीडित युवतीच्या बहीणीचे पती यांनी ११२ वर कॉल करून सदर प्रकाराची माहीती पोलीसांना दिली असता, पोलीसांनी घडलेल्या घटनेचा आढावा घेऊन अमोल नारायण पोटे ( वय. २५ वर्षे रा. संस्कृती डेव्हलपर्स पवार यांचे बिल्डींग मध्ये कारेगाव ता. शिरूर जि.पुणे मुळ रा. ढोकराई फाटा ता. श्रीगोदा जि. अहील्यानगर ) व किशोर रामभाऊ काळे ( वय २९ वर्षे रा संस्कृती . डेव्हलपर्स लेन नं. १ कारेगाव ता. शिरूर जि.पुणे मुळ रा. किल्ले धारूर ता.धारूर जि.बीड ) या दोघांच्या मुसक्या आवळल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून या घटनेचा प्राथमिक तपास रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सविता काळे करत आहेत.
Add Comment