शिरूर : सध्या चर्चेचं केंद्र हे शिरूर तालुका बनले आहे. याच कारणही तसेच आहे. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी हा मूळ शिरूर तालुक्यातील आहे. त्यानंतर कारेगाव बलात्कार प्रकरण आणि आता आरोपीच्या संपर्कात असल्याने चक्क पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शिरूर तालुक्यातच घडला आहे.
पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील करडे येथे एका माजी सैनिकाच्या पत्नीची फसवणूक केल्याने शिरूर पोलिस ठाण्यात संभाजी दगडू वाळके, सचिन संभाजी वाळके, प्रियांका संभाजी वाळके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर पोलिस ठाण्यातील एक अधिकारी आरोपींच्या संपर्कात असल्याने आरोपी मिळत नसल्याचा तक्रारी अर्ज फिर्यादी रेश्मा राहुल वाळके यांनी केला होता. त्याच अनुषंगाने पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख यांनी आरोपी सचिन संभाजी वाळके याच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स काढुन सदर कॉल डिटेल्समध्ये सहायक पोलिस निरीक्षक हणमंतराव गिरी यांनी आरोपी सचिन वाळके याला एकुण ७९ आणि पोलिस हवालदार नारायण जाधव यांनी एकुण २५ कॉल्स केल्याचे आढळून आले आहेत.
आरोपींच्या संपर्कात राहून सहाय्यक पोलिस निरीक्षक हणमंत गिरी आणि पोलिस हवालदार नारायण जाधव यांनी बेशिस्त, बेजबाबदार वर्तन केल्याने या दोन कर्मचाऱ्यांना पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी निलंबित केले आहे.
करडे (ता. शिरुर) येथील डब्ल्यू स्क्वेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Wsquare feeds india private limited) या कंपनीत एका माजी सैनिकाची पत्नी कंपनीत भागीदार असताना बनावट कागदपत्रे बनवुन तिचा राजीनामा घेत तिला कंपनीच्या भागीदारीतुन काढुन टाकण्यात आले होते. याबाबत रेश्मा राहुल वाळके (वय ३७) रा. करडे यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे चार जणांविरोधात २७ जानेवारी २०२५ रोजी फिर्याद दाखल केली आहे.
Add Comment