शिरूर ( पुणे ) : रांजणगाव गणपती येथील ग्रामपंचायत कार्यालयातील 2009-2010 मधील आकारणी रजिस्टरमध्ये शंकास्पद फेरफार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच आणि वसुली लिपिक यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बाळासाहेब रामचंद्र गावडे ( वय 48, विस्तार अधिकारी, पंचायत समिती, शिरूर ) यांनी फिर्याद दिली असून, चौकशी दरम्यान काही सरकारी नोंदींमध्ये बदल झाल्याचे निदर्शनास आले आहे.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, नमुना आकारणी रजिस्टर क्रमांक 8 मध्ये मिळकत क्र. 622/1 व 622/2 या मालमत्तांची नोंद आनंदराव दिनकर पाचुंदकर यांच्या नावाने आहे. मात्र मूळ नोंदीच्या पानावर अतिरिक्त पान चिकटवून फेरफार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.त्याचप्रमाणे, नमुना न. 7 च्या 1960-61 च्या नोंदींमध्ये मिळकत क्र. 51 व 52 या पाचुंदकर यांच्या नावावर दिसत असल्या तरी त्यांच्या खालील नोंदी अस्पष्ट असून त्यामध्ये छेडछाड झाल्याची शक्यता तपासात पुढे आली आहे.
पंचायत समितीने केलेल्या प्राथमिक चौकशीत, संबंधित पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून दस्तऐवजांत बदल केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधितांविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सद्यस्थितीत या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे, व पुढील तपासानंतरच दोष निश्चित होण्याची शक्यता आहे. आगामी काळात संबंधित प्रकरणातील तपास कसा केला जातो त्याचबरोबर या प्रकरणी आणखी कोण कोण दोषी आढळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Add Comment