ताज्या घडामोडी पुणे राजकीय शिरूर

सत्ताधाऱ्यांना एकच प्रश्न, गंगाधर कोण आणि शक्तिमान कोण…?

शिरूर : बाभुळसर खुर्द ग्रामपंचायतीत राजकीय नाट्याचा शिखरबिंदू गाठला गेला आहे. पंधरा वर्षांपासून ग्रामपंचायतीत मजबूत पकड ठेवणाऱ्या सत्ताधारी गटाला एक अनपेक्षित झटका बसला आहे. सत्ताधारी गटाकडे तब्बल सात सदस्य असूनही, केवळ एका मताच्या फरकाने उपसरपंचपदी विरोधी गटाचे गणेश वाळके विजयी ठरले आहेत.

ग्रामपंचायतीत रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी सत्ताधारी गटाच्या सुमन शिंदे आणि विरोधी गटाचे गणेश वाळके यांच्यात थरारक लढत झाली. एकूण नऊ सदस्यांपैकी वाळके यांना ५ मते तर शिंदे यांना ४ मते मिळाली आहे. निकाल जाहीर होताच विरोधी गटात जल्लोष, तर सत्ताधाऱ्यांच्या तळात प्रचंड अशांततेचा माहोल निर्माण झाला. गावात “एक मताने उलटलेले राजकारण” ही चर्चेची ठरलेली मुख्य ओळ बनली आहे.

गेल्या पंधरा वर्षांपासून दशरथ फंड आणि शेखर डाळिंबकर या जोडीचा ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व आहे. २०१० आणि २०१५ या पंचवार्षिकांत दशरथ फंड गावच्या प्रथम नागरिक पदाची धुरा सांभाळली होती. तद्नंतर २०२० पासून त्यांच्या पत्नी सोनाली फंड सत्तेच्या गादीवर विराजमान आहेत. शेखर डाळिंबकर हे सलग दोन पंचवार्षिक उपसरपंच होते. मात्र, यावेळी समीकरणे पूर्णपणे उलटली आणि सत्तेचा किल्ला विरोधकांनी एका मताने फोडला. उपसरपंच पदाच्या खुर्चीचा किल्ला कोसळला आणि एक मत क्रांतीचं शस्त्र ठरलं आहे.

या अनपेक्षित विजयानंतर गावातच नव्हे तर संपूर्ण शिरूर तालुक्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती पै. मंगलदास बांदल यांनी देखील अशाच प्रकारची खेळी बाजार समितीच्या निवडणुकीत केली होती. याच रणनीतीची पुनरावृत्ती त्यांच्याच तालमीत असलेल्या शिष्याने केली आणि ही खेळी बाभुळसर खुर्दपर्यंत पोहोचल्याचे म्हणावे लागेल. गणेश वाळके हे बांदल यांचे कट्टर समर्थक असल्याने, या विजयात त्यांच्या प्रभावाची छाया स्पष्ट दिसून आली आहे. “दिग्दर्शक चित्रपट तयार करतो, तो पडद्याच्या मागे राहून.” गणेश वाळके यांच्या विजयाने केवळ उपसरपंचपदच नव्हे तर बाभुळसर खुर्दच्या राजकीय समीकरणांनाही नवे वळण मिळाले आहे.

निवडणूक अधिकारी सचिन चव्हाण यांच्या देखरेखीखाली निवडणूक शांततेत पार पडली, मात्र निकाल लागल्यावर सत्ताधारी गटातील नाराजीचा सूर स्पष्ट ऐकू येऊ लागला आहे.

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!