Uncategorized

कोण होते आबा?

सांगोला – साधा सर्वसामान्य कार्यकर्ता देखील दुचाकी, चारचाकी शिवाय फिरत नाही. आणि एखादा नेता असेल तर आलिशान गाडीच्या खाली उतरत नाही पण, या सर्वांना ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख अपवाद होते. विधानसभा असो किंवा नागपूरचे हिवाळी अधिवेशन गणपतराव देशमुख हे नेहमीप्रमाणे एसटी महामंडळाच्या बसनेच प्रवास करायचे. तब्बल 11 वेळा आमदार म्हणून निवडून आले. पण, त्यांनीही आमदारकीचा मोठेपणा मिरवला नाही. सर्वसामान्य जनतेसाठी त्यांनी उभे आयुष्य खर्ची घातले.

गणपतराव देशमुख हे मुंबईचा प्रवास महामंडळाच्या एसटी बसनेच करायचे. २०१७ मध्ये नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाला सुद्धा गणपतराव देशमुख एसटी बसनेच गेले होते होते. गणपतराव देशमुख हे राजकारणात येण्यापूर्वी वकिली करत होते.या माध्यमातून त्यांची शेतकरी कामगार पक्षाशी काम करण्याची जवळीक झाली. 1950 पासून ते शेकापचे सक्रिय कार्यकर्ते झाले. 1962 साली गणपतराव देशमुख यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. इथूनच त्यांची राजकीय कारकीर्द बहरू लागली.
पहिल्या टर्मपासून त्यांनी क्रम मोडला नाही, तो शेवटपर्यंत कायम राखला.

पहिली निवडणूक लढवताना दुष्काळी सांगोल्यातील जनतेला पाणी मिळाले पाहिजे, या मागणीसाठी त्यांनी लढाई सुरू केली होती. आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. 1972 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. पण दोन वर्षांतच झालेल्या पोटनिवडणुकीत गणपतराव पुन्हा निवडून आले ते सलग 1995 पर्यंत.

याकाळात 1977 साली त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद सांभळले होते. पुलोद काळात 1978 साली ते पहिल्यांदा राज्यमंत्री मंडळात सहभागी झाले. त्यानंतर 1999 साली पुन्हा मंत्री झाले. याकाळात त्यांनी दुष्काळी भागाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कायम लढा दिला.

त्यांच्या प्रयत्नांमुळेच दुष्काळी सांगोल्यात टेंभू आणि म्हैसाळ योजनेचे पाणी पोहचले 1995 च्या पराभवानंतर गणपतराव देशमुख यांनी 1999 पुन्हा निवडून आले. 2014 पर्यंत त्यांनी 11 वेळा विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केले.

2019 साली सुद्धा त्यांना निवडणूक लावण्याचा आग्रह समर्थ समर्थकांनी केला. पण 94 वर्ष असलेले वय तसेच शरीर साथ देत नसल्याने त्यांनी निवडणूक न लढवण्यावर ठाम राहत आपला निर्णय बदलला नाही. एकच शेतकरी कामगार पक्ष, एकच मतदारसंघ सांगोला विधानसभा मतदारसंघ आणि एकच उमेदवार गणपतराव देशमुख महाराष्ट्रात असं उदाहरण दुर्मिळच आहे. आजोबांपासून नातवाचेही मतदान गणपतराव यांना मिळाले होते. आयुष्यातील 50 वर्ष त्यांनी विधानसभेतील अनेक मुख्यमंत्री आणि मंत्री यांचे काम पाहिली होती. तसंच आपल्या कामाचा ठसा सुद्धा त्यांनी राज्यातील राजकारणात उमटवला होता. आज त्यांच्या जाण्यामुळे विधानसभेचा एक साक्षीदार निखळला अशी भावना व्यक्त होत आहे.

Featured

error: Copying content is not allowed!!!