ताज्या घडामोडी पुणे हवेली

वाघोलीच्या पाण्याचं काय ?

  1. वाघोली – पुणे महानगरपालिकेत नवीन तेवीस गावांचा समावेश करण्यात आला त्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या वाघोली गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही प्रलंबित असल्याचे चित्र समोर आले आहे.
    वाघोली गावची लोकसंख्या दोन लाखाहून अधिक असल्याचे या ठिकाणच्या जाणकारांचे मत आहे. मात्र वाघोलीकरांची वापराच्या आणि पिण्याच्या पाण्याची तहान भागली जात नाही, त्यासाठी पुणे महापालिकेला मिळणारे भामा आसखेड धरणाचे पाणी आमच्याही वाट्याला यावं अशी भावना येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.


मुळातच ही तेवीस गावं पालिकेत समाविष्ट करताना नऊ हजार कोटी रुपये विकास निधी द्यावा अशी मागणी पुणे महानगरपालिकेने राज्य शासनाकडे केली होती, मात्र अद्याप राज्य शासनाने कोणताही निधी दिला नाही. वाघोलीची रोजची तहान भागवण्यासाठी तब्बल 3 कोटी लिटर पाण्याची गरज आहे, मात्र प्रत्यक्षात 25 लाख लिटर पाणी वाघोलीच्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनेतून मिळत आहे. या पाण्यातून वाघोलीची तहान भागली जात नाही. पाण्यासाठी नागरिकांना आपला खिसा मोकळा करावा लागत आहे, नागरिकांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागते. याला पर्याय म्हणून भामा आसखेडचं पाणी वाघोलीला मिळालं तर आमची समस्या सुटणार आहे, मात्र याकडे ना शासन लक्ष देतय ना स्थानिक लोकप्रतिनिधी, केवळ आश्वासन दिले जात आहे ठोस उपाययोजना मात्र कोणतीही केली जात नाही. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही भविष्यात आंदोलन उभं करू, वेळप्रसंगी जेलमध्ये जाण्याची वेळ आली तरी आम्ही मागे हटणार नाही. असं मत भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस संदीप सातव यांनी व्यक्त केले आहे.
वाघोली गावाचा पालिकेत समावेश केला, मात्र वाघोलीच्या पाण्याचं काय.? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. त्यामुळे भविष्यात वाघोलीच्या पाण्याचा प्रश्न पेटणार असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत. या भागाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार याकडे किती गांभीर्याने लक्ष देतात हे पाहणं देखील तितकच महत्वाचं ठरणार आहे.

error: Copying content is not allowed!!!