ताज्या घडामोडी पुणे

बारावीचा निकाल जाहीर ; असा लागला निकाल !

पुणे – राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला असून त्यात बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ९९.६३ टक्के इतका लागला आहे. तर नाशिक विभागाचा निकाल ९९.६१ टक्के आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून १३ लाख १९ हजार ७५४ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १३ लाख १४ हजार ९६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर इतर विभागाचा निकाल असा आहे. कोकण ९९.८१ टक्के, पुणे ९९.७५ टक्के, नागपूर ९९.६२ टक्के, औरंगाबाद ९९.३४ टक्के, मुंबई ९९.३४ टक्के, कोल्हापूर ९९.६७ टक्के, अमरावती ९९.३७ टक्के, लातूर ९९.६५ टक्के आहेत.

बारावीच्या अंतर्गत मूल्यमापन तसेच दहावी व अकरावीच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचा हा निकाल तयार करण्यात आला आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९९.४५, वाणिज्य शाखेचा निकाल ९९.९१ टक्के तर कला शाखेचा निकाल ९९.८३ टक्के, व्यवसाय अभ्यासक्रमांचा निकाल ९८.८० टक्के लागला आहे…

निकालाबाबतचा अन्य तपशील

सन २०२१ मध्ये आयोजित करण्यात आलेली उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्यामुळे शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपध्दती व तरतूदीनुसार व इ.१०वी मधील मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयाचे सरासरी गुण, इ.११ वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण व इ.१२ वीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच इ.१२ वी चे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण इत्यादींच्या आधारे इ.१२ वी साठी भारांशानुसार उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहे. गुणदान विचारात घेवून मंडळाने विहित कार्यपद्धतीनुसार परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केलेली आहे.

दि.२ जुलै २०२१ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार सन २०२१ मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेस श्रेणीसुधार योजनेतंर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्याचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधीमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील एक/दोन संधी उपलब्ध राहतील. अशी माहिती डॉ.अशोक मसले सचिव, राज्यमंडळ, पुणे यांनी प्रकटनाच्या माध्यमातून दिली आहे.

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!