जुन्नर : ऐतिहासिक नाणेघाट जवळील जीवधन किल्ला पाहून खाली उतरत असताना दिल्ली येथील पर्यटक तरुणीचा पाय घसरून दरीत पडल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना आज घडली.
पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेतील मृत तरुणीचे नाव रुचिका सेठ, वय ३० रा. दिल्ली असे आहे. रुचिका ३१ जुलै रोजी दिल्लीहून ठाणे येथील ओमकार बाईत यांचेकडे आली होती. ते दोघे ३ ऑगस्ट रोजी मोटार सायकलवरून कल्याण येथे आले. यानंतर डोंबिवली पूर्व येथील दिनेश रामकरण यादव व मंजू दिनेश यादव यांच्या समवेत मोटारसायकल वरून चौघेही माळशेज घाट मार्गे नाणेघाट येथे आले. येथे त्यांनी रात्री मुक्काम केला. सकाळी चौघे जीवधन किल्ला पहाण्यासाठी गेले होते. किल्ला पाहून परत येत असताना ही दुर्घटना घडली. जखमी रुचिकास जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले यावेळी ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
जीवधन किल्ल्यावरून घसरून पडल्याने जखमी झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. मात्र, मृत झाल्याची ही पहिलीच घटना आहे. पर्यटनास बंदी असताना देखिल नाणेघाट परिसरात पर्यटनास येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. पोलिसांच्या दंडात्मक कारवाईची भीती पर्यटकांना नसल्याचे दिसून येते आहे. पर्यटकांनी पावसाळी पर्यटनाची जोखीम घेऊ नये असे आवाहन जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जाधव यांनी केले आहे
Add Comment