राजगुरुनगर पुणे – राज्यभर गाजलेल्या खेड पंचायत समितीच्या अविश्वास ठराव प्रकरणाचा फैसला १८ ऑगस्ट रोजी होणार आहे.
शिवसेनेच्या पोखरकर यांच्या विरोधातील अविश्वास ठराव ३१ मे रोजी ११ विरुद्ध ३ मतांनी मंजूर झाला होता. त्या निर्णयाला आव्हान देत सभापती पोखरकर, पंचायत समिती सदस्य अमोल पवार व ज्योती अरगडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेवर सुनावणी झाल्यावर, दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने अविश्वास ठरावावर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश २७ जुलै रोजी दिले होते.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकरांवरील अविश्वास ठरावावर १८ ऑगस्ट रोजी मतदान घेण्याचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी लावला आहे. त्यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून खेडचे उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण यांची नियुक्ती केली आहे. १८ ऑगस्ट रोजी दुसऱ्यांदा होणाऱ्या ठरवाच्या कार्यवाहीसाठी पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी नोटीसा सर्व १४ पंचायत समिती सदस्यांना बजावल्या आहेत. अविश्वास ठरावावर ३१ मे रोजी झालेल्या मतदानात ठरावाच्या बाजूने ११ मते पडून ठराव मंजूर झाला होता. त्यात शिवसेना बंडखोर ६, राष्ट्रवादी काँग्रेस ४ व भाजप १ असे समर्थक होते. त्यातील एक बंडखोर शिवसेनेच्या गोटात परतले आहेत. तरी ठराव मंजुरीसाठी लागणारे दोन तृतीयांश संख्याबळ म्हणजे दहा सदस्य अजूनही सभापती पोखरकर यांच्या विरोधी गटाकडे आहे. त्यामुळे या वेळी काही राजकीय घडामोड घडू शकतात अशी दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करणाऱ्या शिवसेनेच्या ६ सदस्यांना पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल अपात्र ठरवण्याचा प्रस्ताव शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे ९ जून रोजी दाखल केलेला आहे. त्याच्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
Add Comment