क्राईम ताज्या घडामोडी पुणे शिरूर

शिरुर तालुक्यातील अधिकारीही वसुलीबहाद्दर…?

शिरूर, पुणे – शिरूर तहसिल कार्यालय नेहमीच गैरकारभारामुळे चर्चेत असते मग ते तहसीलदारांचा वाढदिवस असो, आखाड पार्टी असो की वाळूचा भ्रष्टाचार असो.

गेल्या वर्षी तहसील कार्यालयाने तळेगाव ढमढेरे ता. शिरूर येथे वाळूच्याअवैध वाळू वाहतूक करणाऱ्या चार गाड्या महसूल पथकाने पकडून ताब्यात घेऊन धान्य गोदामात पुढील कार्यवाहीसाठी ठेवल्या होत्या. मात्र रात्रीत चार गाड्या चोरीला गेलेल्या असल्याची फिर्याद शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तळेगाव ढमढेरे येथील मंडळ अधिकारी यांनी दिली होती. शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये वाळूच्या गाड्या पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक राजेश माळी हे करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर काही वाहन मालकांना अटक देखील करण्यात आली होती. परंतु तालुक्यातील एका सामाजिक कार्यकर्त्याने माहिती अधिकाराच्या अर्जद्वारे वरिष्ठ कार्यालयाकडून खळबळजनक लेखी माहीती मिळवली आहे आणि ती माहिती अतिशय धक्कादायक असल्याचे समोर आले आहे.
यामध्ये पत्राद्वारे तहसील कार्यालयातील जबाबदार अधिकार्‍याने स्वहस्ताक्षरात लेखी खुलासा वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला होता. त्यामध्ये अतिशय धक्कादायक स्पष्टीकरण करण्यात आले आहे. यामध्ये वाळूच्या चार गाड्यांपैकी दोन वाहने सोडण्यासाठी प्रत्येकी एक लाख वीस हजार रुपये ( १, २०, ००० ) घेऊन एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नातेवाईकांकडे दिल्याचे नमूद केले आहे. उर्वरित दोन गाड्यांचे एक लाख पंचवीस हजार रुपये ( १, २५, ००० ) यामध्ये तहसील कार्यालयातील एका कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचाही सहभाग असल्याचे लेखी पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर यामध्ये एका पत्रकाराच्या नावाचाही उल्लेख आढळून आला आहे.

या खळबळजनक स्पष्टीकरणा वरून वरील वाळूच्या वाहनांची चोरी झाली नसून ती शासकीय अधिकारी व खाजगी व्यक्तींनी केलेला हा बनाव असल्याचे समोर आले आहे. आशा प्रकारचा बनाव करून लाखो रुपयांचा अपहार करत तहसील कार्यालय मोठा भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे की काय.? असा संशय निर्माण झाला आहे. यामध्ये शासकीय यंत्रणांचा पद्धतशीर वापर करून लाखो रुपयांची माया जमा करण्याचे काम अधिकारीच करत आहेत.
अशा प्रकारच्या गंभीर भ्रष्टाचाराच्या विरोधात पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी या प्रकरणात लक्ष घालून तातडीने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून या गुन्ह्यांमध्ये आरोपी असणाऱ्यावर गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. ही चोरी नसून चोरीचा बनाव करणाऱ्या कारस्थानी आणि वसुलीबहाद्दर अधिकार्‍यांचा अखेर भांडाफोड झाला आहे.
मुळातच एवढे सगळे लेखी पुरावे असताना वरीष्ठ अधिकारी कारवाई का करत नाही ? असा सवाल उपस्थित होत आहे.

error: Copying content is not allowed!!!